Monsoon Rain Update Maharashtra: उन्हाच्या झळांनी, उकाड्यानं हैराण झालेल्या  राज्यातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. नैऋत्य मान्सूनने अखेर महाराष्ट्रात प्रवेश केलाय. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण बदललं आहे. राज्यातील बहुतांश भागात ढगांची दाटी होऊ लागली आहे. वैशाख वणवा संपला, नवतपाही ओसरला. 4 जून रोजी केरळमध्ये दाखल झालेला मान्सून महाराष्ट्रासाठी अनुकूल झाली आहे.  भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनची प्रगती सुरू असून कोकणातील देवगडपर्यंत मान्सूनची रेषा पोहोचली आहे. तसेच गोवा संपूर्णपणे मान्सूनच्या कवेत आला आहे. 

Continues below advertisement

हवामान खात्याची महत्त्वाची अपडेट

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून महाराष्ट्राच्या आणखी भागांमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल असल्याचेही विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, मान्सूनच्या आगमनामुळे मुंबईसह संपूर्ण कोकण पट्टा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत. काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक मान्सूनची आतुरतेने वाट पाहत होते. आता मान्सूनने महाराष्ट्रात हजेरी लावल्याने खरीप हंगामाच्या कामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाकडून पुढील काही दिवसांच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

पुढील 4 दिवस महाराष्ट्रात मान्सूनसरी

महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाचा जोर वाढू लागला असून गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातील वातावरणात मोठा बदल पाहायला मिळत आहे. अनेक भागांत ढगाळ वातावरणासह पावसाच्या सरी कोसळत आहेत. प्रादेशिक हवामान केंद्राने आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यांसाठी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भाग आणि संपूर्ण विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील चार दिवस राज्यभरात ठिकठिकाणी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Continues below advertisement

आज कुठे इशारे?

दुसरीकडे, पालघर, ठाणे आणि मुंबई परिसरात उष्ण व दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. दुपारनंतर मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात 9 जूनपर्यंत पावसाचा जोर कायम राहू शकतो.

हवामान विभागाने नाशिक, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि अहमदनगर जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर, बीड, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्येही मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता असताना विदर्भातील काही भागांत मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.