मुंबई : राज्यसभेच्या 24 रिक्त जागा आणि पोटनिवडणुकीसाठी निवडणूका जाहीर झाल्या आहेत. यामध्ये आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकमधून प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशमधून प्रत्येकी 3, झारखंडमधून 2 आणि मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश व मिझोराममधून प्रत्येकी 1 जागेचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, महाराष्ट्रातील आणि तामिळनाडूमधील एका जागेसाठी पोटनिवडणूक देखील याच दिवशी होईल. आगामी 18 जून रोजी मतदान पार पडणार आहे आणि त्याच दिवशी निकाल जाहीर केले जातील. याचदरम्यान, एक महत्वाची घडामोड घडत असल्याचं दिसून येत आहे. माजी खासदार नवनीत राणा यांचा राज्यसभेची उमेदवारी (NCP Rajya Sabha Seat) मिळवण्यासाठीचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून राज्यसभेची उमेदवारी (NCP Rajya Sabha Seat) लवकरच जाहीर केली जाणार आहे. यासाठी नवनीत राणा यांनी बुधवारी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची भेट घेतल्याचं सांगण्यात येत आहे. तर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा नवनीत राणा आणि रवी राणा यांनी भेट घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील जागेवर नवनीत राणा यांना उमेदवारी मिळावी, यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र आपल्या कोट्यातील जागा नवनीत राणा राष्ट्रवादीसाठी सोडणार का? हा सुद्धा प्रश्न आहे. त्यामुळे या भेटीगाठीमुळे सुनेत्रा पवारांच्या जागी नवनीत राणा यांची वर्णी लागते का?, हे आगामी दिवसांत स्पष्ट होईल. तर राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरायला आता केवळ १ दिवस बाकी आहे, या अनुषंगाने प्रफुल पटेल यांच्या मुंबईतील निवासस्थानी बैठक सुरु आहे. (NCP Rajya Sabha Seat)
NCP Rajya Sabha Seat : नवनीत राणा यांच्याशी संपर्क साधून उमेदवारीची विनंती
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अद्याप राज्यसभेचा उमेदवार निश्चित नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या राज्यसभेसाठी मंत्री छगन भुजबळ इच्छुक आहेत. पक्षाकडून माजी खासदार नवनीत राणा यांच्याशी संपर्क साधून उमेदवारी घेण्याची विनंती केली आहे. नवनीत राणा यांच्याकडून विचारधारेची अडचण लक्षात घेत उमेदवारीस नकार दिल्याची माहिती आहे. पक्षाकडे ठाकरेंच्या एका माजी खासदाराकडून देखील उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न आहे, मात्र संबंधित उमेदवाराला पक्षाकडून अपेक्षित प्रतिसाद नाही, अशी सूत्रांची माहिती आहे. उद्या प्रमुख नेते मुंबईत एकत्रित बसून अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि खासदार प्रफुल पटेल यांच्या मुंबईतील निवासस्थानी बैठकीला सुरुवात झाली आहे.
NCP Rajya Sabha Seat : राज्यसभेसाठी सध्या छगन भुजबळ यांचं नाव आघाडीवर
राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. बैठकीला पार्थ पवार, मंत्री छगन भुजबळ आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित आहेत. आजच्या बैठकीत उमेदवारी बाबत चर्चा झाल्यानंतर सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत उद्या बैठक पार पडण्याची शक्यता आहे. राज्यसभेसाठी सध्या छगन भुजबळ यांचं नाव आघाडीवर आहे. पार्थ पवार यांच्याकडून देखील काही नावांचा आग्रह धरण्यात आला आहे, अशी विश्वसनीय सूत्रांची एबीपी माझाला माहिती आहे.
Rajya Sabha Seat : अमोल मिटकरींची सोशल मिडीया पोस्ट चर्चेत
अमोल मिटकरींनी राज्यसभा निवडणुकीच्या संदर्भात पोस्ट करत म्हटलंय की, आदरणीय सुनेत्रावहिनींची राज्यसभेची रिक्त जागा ही फक्त राष्ट्रवादीचीच आहे! यावर दुसऱ्या कुणी हक्क सांगून मोर्चेबांधणी करू नये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला “अजितदादा”नावाचं अधिष्ठान आहे. त्यामुळे आदरणीय वहिनी घेतील तोच निर्णय अंतिम राहील. हा पक्ष अजितदादांचा दरारा असणारा पक्ष आहे. तुर्तास इतकेच, असंही अमोल मिटकरींनी म्हटलं आहे.
