Monsoon : राज्यात सध्या काही भागात पाऊस (Rain) सुरु आहे, तर काही ठिकाणी पावसानं उघडीप दिली आहे. दरम्यान, वायव्य राजस्थानमधून परतीच्या पावसाला सुरुवात झाल्याचा अंदाज हवामान विभागानं (Department of Meteorology) वर्तवला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हवामान अभ्यासकांचा सुळसुळाट झाला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत. त्यामुळं शेतकरी तसेच सामान्य नागरिक संभ्रमात आहेत. एका कथित हवामान अभ्यासकानं मान्सूनचा मुक्काम जानेवारी महिन्यापर्यंत वाढणार असल्याचा दावा केला होता. मात्र, नेमका पावसाचा अंदाज काय? कधीपर्यंत पाऊस पडणार, परतीचा पावसाला कधी सुरुवात होणार यासंदर्भात एबीपी माझानं काही अनुभवी हवामान तज्ज्ञांशी संपर्क सधला आहे. ते नेमकं काय म्हणालेत ते पाहुयात....


मान्सूनबाबत काही जणांचे खोटे दावे, त्याला वैज्ञानिक बेस नाही : कृष्णानंद होसाळीकर


दरम्यान, हवामानाच्या अंदाजाबाबात पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर (Krishnanand Hosalikar) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.  तथाकथित स्वयं दावा केलेल्या तज्ञांकडून पूर्णपणे दिशाभूल करणारी माहिती दिली जात आहे. शेतकरी आणि सामान्य जनतेसाठी ही माहिती टाळली पाहिजे. मान्सूनचा मुक्काम जानेवारी महिन्यापर्यंत वाढणार असल्याचे दावे खोटे असल्याचे होसाळीकरांनी म्हटलं आहे. त्याला कोणताही  वैज्ञानिक बेस नसल्याचे होसाळीकरांनी म्हटलं आहे. दुर्दैवाने हे वारंवार घडत आहे. ते माझ्या महाराष्ट्रासाठी धोकादायक असल्याचं होसाळीकरांनी म्हटलं आहे. 


राजस्थानमधून परतीच्या पावसाला सुरुवात


आजपासून वायव्य राजस्थान तसेच गुजरातच्या कच्छमदून परतीच्या पावसाला सुरुवात झाली असल्याची माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. सरासरी तारीख 17 सप्टेंबर होती मात्र, तीन दिवस उशीरा सुरुवात झाली आहे. त्यासाठी लागणाऱ्या कंडिशन पूऱ्ण केल्या आहेत. यामध्ये  पहिले म्हणजे वाऱ्याची चक्रावात स्थिती, दुसरी गोष्टी हवेतील आर्द्रता खूप कमी होते आणि तिसरी म्हणजे सलग पाच दिवस तिथे पाऊस पडत नाही. अशी स्थिती झाली तर तिथून परतीचा पाऊस सुरु झाल्याचे म्हटले जाते. दरम्यान, पुढचे दोन दिवस महाराष्ट्रातील विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असल्याचे होसाळीकर म्हणाले. पुढचे दोन दिवस राज्यात पावसाचा अंदाज आहे. 


'या' तीन अवस्था पूर्ण झाल्यास परतीचा पाऊस सुरु होतो


महाराष्ट्रातील परतीच्या पावसासंदर्भात देखील होसाळीकर यांना विचारण्यात आले यावेळी त्यानी सांगितले की, वाऱ्याची चक्रावात स्थिती, हवेतील आर्द्रता खूप कमी होणे आणि सलग पाच दिवस तिथे पाऊस पडत नाही तर परतीच्या पाऊस सुरु झाल्याचे म्हटलं जाते. ही स्थिती जेव्हा सुरु होईल त्यावेळी राज्यातून परतीच्या पावसाला सुरुवात होईल असे होसाळीकर म्हणाले. आणखी दोन दिवस राज्यात पावसाचा अंदाज असल्याचे होसाळीकरांनी सांगितले.


सध्याची भौगोलिक स्थिती पाहता परतीच्या मान्सूनसाठी पोषक वातावरण : उदय देवळाणकर


मान्सूनच्या परतीच्या अंदाजाबाबात एबीपी माझानं कृषी अभ्यासक आणि हवामन तज्ज्ञ उदय देवळाणकर (Uday Deolankar) यांच्याशी संपर्क सधाला. यावेळी त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. चालू वर्ष हे ला निना वर्ष आहे. आता ला निना म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असले. ला निना म्हणजे जेव्हा प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागातील पाण्याचे तापमान थंड होते, तेव्हा पश्चिमेकडील भागातील हवेचा दाब कमी होतो. तेव्हा प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडील भागाकडे वारे पाण्याची वाफ ढगांच्या स्वरुपात वाहून आणतात आणि त्यातून पश्चिमेकडील भागात अतिवृष्टी होते. त्यालाच ला निना असे संबोधले जाते. या ला निना वर्षात अधून-मधून पावसाची शक्यता असते. मात्र, सध्याच्या भौगोलिक स्थिती पाहता परतीच्या मान्सूनसाठी पोषक वातावरण झालं आहे. पावसाळा जास्त दिवस लांबेल असं म्हणणं संयुक्तिकरित्या वाटत नसल्याचेही देवळाणकर म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Rain : मुंबईसह अकोल्यात पावसाची जोरदार हजेरी, आज विदर्भासह मराठवाड्यात यलो अलर्ट