मुंबई : मुंबईत एकाचवेळी एकाच ट्रॅकवर दोन मोनोरेल आमने सामने आल्याची घटना घडली आहे. चेंबूर स्थानकावर शनिवारी रात्री 9 च्या सुमारास ही घटना घडली. एका मोनोमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं दुसरी मोनो मदतीसाठी पाठवल्याचं स्पष्टीकरण एमएमआरडीएकडून देण्यात आलंय. पण, हा अपघात असल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.

शनिवारी रात्री 9 वाजता चेंबूर स्थानकात दोन मोनोरेल एकाच ट्रकवर समोरासमोर आल्या. या प्रकारावर सारवासारव करत तांत्रिक बिघाड झाल्यानं दुसरी मोनोरेल मदतीसाठी आल्याचं स्पष्टीकरण दिलं. मात्र आसपास राहणाऱ्या नागरिकांनी हा अपघात असल्याची माहिती दिली आहे. या अपघातात 2-3 प्रवासी जखमी झाल्याचंही सांगण्यात येत आहे.

"रात्री 9 वाजण्याच्या सुमारास मोनो लाईनवर मोठा आवाज झाला, यावेळी आम्ही घाबरुन त्यादिशेनं पाहिलं. तर ट्रॅकवर दोन मोनो समोरासमोर धडकल्या होत्या. निळ्या रंगाची मोनो कमी वेगात होती, तर हिरवी मोनो वेगात येऊन समोरच्या मोनोरेलला धडकली. यात 3 ते 4 जण जखमी झाले आहेत, तर मोनोमध्ये अडकलेल्या मोटरमनला तब्बल चार तासांनी बाहेर काढण्यात आलं."


अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.


एमएमआरडीए मात्र हा केवळ तांत्रिक बिघाड असल्याचं सांगितलं आहे. विशेष म्हणजे घटनेला चार उलटल्यानंतर मोनोमध्ये अडकलेल्या एका कर्मचाऱ्याला बाहेर काढण्यात यश आलं. रात्री उशिरापर्यंत मोनो ट्रॅकवर दुरुस्तीचं कामही सुरु होतं. त्यामुळं नेमकं काय घडलं, हाच प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.