भाजप आमदार देवराव होळी घोटाळ्यात दोषी, आमदारकी धोक्यात
एबीपी माझा वेब टीम | 19 Jan 2017 07:16 PM (IST)
गडचिरोली: गडचिरोलीचे भाजप नेते आणि आमदार देवराव होळी यांची आमदारकी धोक्यात आली आहे. कारण आरोग्य खात्यात असताना देवराव होळी यांनी केलेल्या घोटाळ्याप्रकरणी नागपूर खंडपीठानं त्यांना दोषी ठरवलं आहे. त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का मानला जातो आहे. काय आहे देवराव होळी यांचं प्रकरण? डॉ. देवराव होळी हे गडचिरोली जिल्हा परिषदेत वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवेत होते. त्यांनी सिकलसेल आजारावर नियंत्रणासाठी शकुंतला मेमोरियल संस्था सुरु केली होती. डॉ. देवराव होळी हे शकुंतला संस्थेचे अध्यक्ष होते. तिथं त्यांनी 50 कर्मचारी असल्याचं दाखवले होते. 2008-09 मध्ये एकात्मिक आरोग्य कल्याण अंतर्गत 32 लाख रुपये वितरित झाले होते. यावेळी शंकुतला संस्थेत खोटे कर्मचारी दाखवून होळींनी 8 लाख 68 हजार रुपये घेतले होते. यामुळे त्यांच्यावर शासकीय रकमेचा अपहार केल्याचा आरोप लावण्यात आला होता. चार्मोशी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात तक्रार नोंदविण्यात आली होती. याच प्रकरणी आज झालेल्या सुनावणीत कोर्टानं त्यांना दोषी ठरवलं आहे. त्यामुळे आता त्यांची आमदारकी धोक्यात आली आहे.