लातूर: लातूरच्या मोहसिन शेख या 25 वर्षाच्या तरुणानं एक इतिहास घडवला आहे. वयाच्या पाचव्या वर्षापासून वीटभट्टीवर काम करणारा हा तरुण चार्टड अकाऊटंट अर्थात सीए झाला आहे.

पहाटे पाच वाजता उठायचं...सात वाजेपर्यंत काम करायचं...सात वाजता अर्धा किलोमीटर अंतरावरच्या शाळेत चालत जायचं. साडे बारला जेवण संपवून 1 ते रात्री 9 पर्यंत वीटभट्टीवर काम. दहा ते दोन अभ्यास, अशा कठीण परिस्थितीत मोहसिननं मिळवलेलं यश जबरदस्त आहे.

त्याची बुध्दी पाहून शिर्डीच्या साई बाबा मंदिराचं ऑडिट करणाऱ्या सीए फर्मनं मोहसिनला पार्टनर केले आहे.

मोहसिनचा संघर्ष

शेख कुटुंबात अठरा विश्व दारिद्र्य. मोहसिनचे वडील दारुच्या आहारी, आई आणि भाऊ- बहिणी वीट भट्टीवर काम करुन पोट भरतात. मोहसिनला समज येऊ लागली तेव्हापासून तोही आईच्या साथीने वीटभट्टीवरच कामाला लागला.

घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे मोहसिनला मावशीकडे पाठवलं. मावशीची परिस्थितीही फार ग्रेट होती असं नाही. मावशीही वीटभट्टीवरच काम करते. मोहसिनचं बालपण मावशीकडेच गेलं.

पहाटे पाच वाजता उठायचं...सात वाजेपर्यंत वीटभट्टीवर काम करायचं...सात वाजता अर्धा किलोमीटर अंतरावरच्या शाळेत चालत जायचं. साडेबारापर्यंत शाळा करुन एक वाजता वीट भट्टीवर यायचं. मग 1 ते 9 काम करायचं. रात्री दहाला घरी पोहोचल्यावर रात्री 2 पर्यंत अभ्यास करायचा, असा संघर्ष मोहसिनच्या यशामागे आहे.

 “ज्यादिवशी पाऊस पडायचा तो माझ्यासाठी आनंदाचा दिवस असायचा. कारण त्यादिवशी वीटभट्टीवर काम नसायचं. पण त्यादिवशी वीटा वाहून नेण्याचं काम करावं लागत असे. आजही आई-मावशी तेच काम करतात.

आई, भाऊ, मावशी यांना माझ्याबद्दल सकारात्मकता वाटायची. मी काही तरी करुन दाखवेन असं त्यांना नेहमी वाटत असे. त्यामुळे त्यांनी मला हवी ती मदत केली. सीएच्या नोंदणीसाठी माझ्याकडे पैसे नव्हते, तेव्हा भावाने एन्गेजमेंट रिंग विकून पैसे दिले, असं मोहसिन सांगतो.

एखाद दिवशी काम खूप असेल तर शाळेत जाऊ नकोस असं मावशी सांगायची. पण त्यादिवशी मला खूप वाईट वाटायचं, मी जेवत नसे, नाराज असे, असं मोहिसनने सांगितलं.

खर्च कमी असतो त्यामुळे सीएचं क्षेत्र निवडलं. या काळात मला अनेकांनी मदत केली, त्यामुळेच आजचं यश पाहू शकतो, असं तो म्हणाला.

चार वर्षापूर्वी जेव्हा तयारी सुरु केली, तेव्हा अनेक प्रस्थापित सीएंनी मोहसिनकेड तुच्छतेने पाहिलं. अंथरुण पाहून पाय पसरावं, असं सीएंनी मोहसिनला सुनावलं. मात्र मी सचिन शिंदे सरांची फर्म जॉईन केली, तेव्हा त्यांनी मला दुसऱ्या तिसऱ्याच दिवशी सांगितलं, तुझं भविष्य उज्ज्वल आहे, तू ज्या दिवशी सीए होशील, त्यादिवशी तुला मी माझ्या फर्ममध्ये पार्टनर म्हणून घेणार, असं त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं, तो शब्द त्यांनी पाळला, असं मोहसिन म्हणाला.

VIDEO: