मुंबई : संपादित जमिनीच्या योग्य मोबदल्यासाठी मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या 80 वर्षीय आजोबांना 15 लाखांचं सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा शासनाने केली. मात्र त्यांचा मुलगा नरेंद्र पाटील याने हे अनुदान नाकारलं आहे.
मोबदला वाढवून देण्याच्या मागणीवर नरेंद्र पाटील ठाम आहे, म्हणूनच त्याने हे अनुदान नाकारलं. धुळ्याच्या धर्मा पाटील यांना अनुदान देण्याची घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती. सानुग्रह अनुदान एक महिन्याच्या आत मिळेल असं आश्वासनही बावनकुळे यांनी दिलं होतं.
धुळे जिल्ह्यात होणाऱ्या औष्णिक वीज प्रकल्पात त्यांची पाच एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र पाच एकराच्या बदल्यात त्यांना केवळ चार लाख रुपये भरपाई देण्यात आली.
इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत भरपाई कमी मिळाल्याबाबत धर्मा पाटील यांनी गेल्या तीन महिन्यांपासून पाठपुरावा सुरु केला. मात्र त्यांना अधिकारी आणि संबंधित मंत्रालयाकडून योग्य उत्तर मिळत नसल्याने त्यांनी विषप्राशन केलं.
सेंट जॉर्ज रुग्णालयात धर्मा पाटील यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.
धर्मा पाटील यांच्या चार एकर जमिनीत आंब्याची 600 झाडं होती. विहीर, ठिबक सिंचन आणि वीज अशी बागायती शेती असलेल्या धर्मा पाटील यांना केवळ 4 लाखांचा मोबदला देण्यात आला. तर दुसऱ्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात आला आहे.
योग्य मोबदल्यासाठी धर्मा पाटील गेल्या तीन महिन्यांपासून मंत्रालयाचे उंबरे झिजवत आहेत. मात्र त्यांना कुणीही प्रतिसाद देत नसल्याने हतबलतेतून त्यांनी अखेर स्वतःला संपवण्याच प्रयत्न केला.