Pune News:   दसरा मेळ्याव्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नातवाबाबत केलेल्या टीकेवरून वाद पेटला आहे. उद्धव ठाकरे यांनी केलेले हे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबाला उद्देशून असल्याचा दावा शिंदे गट आणि भाजपने केला आहे. आता त्याचे पडसाद आता पुण्यात बघायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे (shrikant shinde) यांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेलं 'एक दुखावलेला बाप' या पत्राचे फ्लेक्स पुण्याच्या रस्त्यावर झळकत आहे. 


खासदार श्रीकांत शिंदे यांनी सोशल मीडियावर त्यांना पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला भावनिक उत्तर दिलं आहे. उद्धव यांनी घरणेशाही आणि नातवावरून शिंदे यांच्यावर टीका केली असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे मुख्यमंत्र्याचं कुटुंब आणि शिंदे गटातील अनेक नेते नाराज आहेत. पुण्यातील शिंदेगटाच्या 'युवा सेने'कडून हे पोस्टर लावण्यात आलं आहे. 


पत्रात नेमकं काय लिहिलं आहे?


खासदार श्रीकांत शिंदे यांनी लिहिलेल्या अनावृत्त पत्रात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. खासदार शिंदे यांनी म्हटले की, काल विजयादशमी झाली. या नवरात्रीच्या निमित्ताने नऊ दिवस सारा महाराष्ट्र आदिशक्तीचा जागर करीत होता. तिच्या शक्ती आणि भक्तीचे पोवाडे गात होता आणि तिच्याकडेच आशीर्वादही मागत होता. कालचा दिवस म्हणजे नऊ दिवसांच्या आनंदाच्या माळेनंतरची सोन्याची माळ. हा दिवस सत्याचा असत्यावर विजय मिळवण्याचा आणि आनंद लुटण्याचा. मात्र काल उभ्या महाराष्ट्रानं काय पाहिलं? काय ऐकलं? महाराष्ट्रानं जे पाहिलं आणि तुमच्या तोंडून जे ऐकलं त्याची दखल घेऊन अत्यंत व्यथित मनानं आज तुम्हाला हे पत्र लिहीत आहे. हे पत्र माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या ‘खासदार मुला’चं नाही; हे पत्र आहे रुद्रांश श्रीकांत शिंदे या दीड वर्षाच्या निरागस, चिमुकल्याच्या ‘बापा’चं. माझं हे पत्र तुम्ही नीट, सहृदयतेनं पूर्णपणे वाचावं, अशी तुम्हाला सुरुवातीलाच हात जोडून विनंती करत असल्याचं त्यांनी लिहिलंय.


काल आमचा - शिवसेनेचा दसरा मेळावा बीकेसी मैदानात दणक्यात झाला. तुम्हीही तुमचा मेळावा शिवाजी पार्कमध्ये घेतलात. आपापल्या राजकीय भूमिका मांडणं, प्रतिस्पर्ध्यावर टीका करणं हे राजकारणात होणारच. त्यावर माझा आक्षेप नाहीच. तुम्ही तुमच्या मेळाव्याची जाहिरात काय केली होतीत? धगधगत्या हिंदुत्वाचे विचार ऐका वगैरे. कालच्या सभेत तुम्ही हिंदुत्वाचे काय विचार ऐकवलेत ते फक्त तुम्हालाच ठाऊक. मला तुम्हाला फक्त इतकंच विचारायचं आहे की, एका दीड वर्षाच्या अजाण बाळाला आपल्या भाषणात खेचणं तुमच्या धगधगत्या हिंदुत्वात बसतं का?, असं लिहत त्यांनी उद्धव ठाकरेंना जाब विचारला आहे. 


शिंदे गटाकडून निषेध


उद्धव ठाकरेंनी केलेल्या या टीकेनंतर शिंदे गटातील अनेक नेत्यांची याबाबत निषेध नोंदवला आहे. मंत्री शंभूराज देसाई यांनीदेखील उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दीड वर्षाचा नातवावर झालेली टीका खालच्या दर्जाची होती. शिंदे गट म्हणून आमच्यावर भरसभेत टीका करणं आम्ही समजू शकतो. आतापर्यंत त्यांनी केलेल्या अनेक टीका ऐकल्या किंवा अनेक प्रकारच्या टीका आपण रोज ऐकतो मात्र रुद्रांश शिंदेवर झालेली टीकेमुळे आम्ही अत्यंत दुखावल्या गेलो आहेत. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंकडून अशा खालच्या दर्जाच्या टीकेची अपेक्षा नव्हती. या टीकेचा मी निषेध करतो, अशी प्रतिक्रिया उत्पादन शुल्कमंत्री आणि शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी दिली आहे.