मुंबई : महाराष्ट्राचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून तर शिवसेनेचे तिसरे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पद आणि गोपनियतेची आज शपथ घेतली. 'मी, उद्धव बाळासाहेब ठाकरे' असं म्हणत छत्रपती शिवराय आणि माता-पित्यांना वंदन करुन उद्धव ठाकरे यांनी शपथ सुरु केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्वांना शपथ दिली. शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तमाम जनतेला वंदन केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे एकनाथ शिंदे , सुभाष देसाई, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, नितीन राऊत तर राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.



राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शपथ घेतली. यावेळी छगन भुजबळांनी महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करून शरद पवारांच्या आदेशानुसार शपथ घेत असल्याचे सांगितले.


राष्ट्रवादीचे प्रदेशाध्याक्ष जयंत पाटील यांनीही आज शपथ घेतली. जयंत पाटलांनी शरद पवार यांना वंदन करून शपथ घेतली. यावेळी जयंत पाटील आपल्या आई-वडिलांचेही नाव घेतले.


शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि आई-वडिलांचं स्मरण करुन शपथ घेतली.



शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी शपथ घेतली. सुभाष देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करुन शपथ घेतली.


काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शपथ घेतली. सोनिया गांधी यांच्या आशीर्वादाने शपथ घेत आहे, असं ते म्हणाले.



काँग्रेस नेते नितीन राऊत यांनीही शपथ घेतली. नितीन राऊत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करुन शपथ घेतली. तर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या आशीर्वादाने तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या साक्षीने शपथ घेत असल्याचं सांगितलं.