नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या कार्यक्रमात आज देशभरातल्या दुष्काळावर भाष्य केलं. दुष्काळानं लोकांचं जगणं हैराण केलं असलं तरी महाराष्ट्रातील हिवरे बाजारमधल्या जलयुक्त कामांचं यावेळी पंतप्रधानांनी कौतुक केलं.


 
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी हिवरे बाजारनं आपली पीक पद्धत बदलली. सिंचनाचा वापर केला याचा उल्लेख करत पंतप्रधानांनी हिवरे बाजारच्या समृद्धीचा दाखला दिला.

 
हिवरे बाजार पाठोपाठ मध्य प्रदेशच्या देवास या ठिकाणी झालेला कायापालटही मोदींनी समोर आणला. पाण्याचं दुर्भिक्ष्य असताना पाणीबचत आणि समुहानं काय घडू शकतं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे देवास पॅटर्न असल्याचं मोदींनी म्हटलं.

 
एबीपी माझानं सर्वप्रथम या दोन्ही गावांचा झालेला कायपालट लोकांपुढे आणला होता.