लातूरला पाणीपुरवठ्याबाबत खडसे-महाजनांची परस्परविरोधी माहिती
निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर | 24 Apr 2016 02:02 AM (IST)
लातूर : लातूरला पाणीपुरवठा करण्याच्या निमित्ताने राज्य सरकारमधला बेबनाव पुन्हा एकदा उघड झाला आहे. एकीकडे निम्न दूधना धरणातून लातूरला पाणी देणे शक्य असल्याचं महसूलमंत्री एकनाथ खडसे म्हणत असताना जलसंपदामंत्री गिरीश महाजनांनी मात्र ते शक्य नसल्याचं म्हटलं आहे. लातूरला सध्या मिरजेतून रेल्वेनं पाणीपुरवठा होत आहे. मात्र जालना जिल्ह्यातील परतूरच्या निम्न दुधना धरणातून लातुरला पाणी देऊ, त्यासाठी रेल्वेमंत्र्यांकडे नवीन रेल्वेची मागणी केली असल्याची माहितीही एकनाथ खडसेंनी दिली. लातूरसाठी येत्या 15 ते 17 दिवसात निम्न दूधना धरणातून रोज 25 लाख लीटर पाणी आणू, याबाबतचा प्रस्ताव रेल्वेच्या नांदेड विभागाकडे देण्यात आला असून सुरेश प्रभूंनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचंही खडसेंनी म्हटलं. मात्र, त्याचवेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी अशाप्रकारे पाणी पाठवणं शक्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे कोणाच्या माहितीत तथ्य आहे, याबाबत गोंधळाचं वातावरण आहे.