जळगाव : मुंबई, ठाणे, पुणे किंवा अगदी नाशिकपुरतीच राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना मर्यादित असल्याची टीका होत असताना, सर्वांनाच धक्का देणारी घटना जळगावात घडली आहे. जळगावच्या महापौरपदी मनसेचे ललित कोल्हे विराजमान झाले आहेत.


जळगाव महापालिकेत खान्देश विकास आघाडीचे नितीन लद्धा महापौर होते. त्यांनी महापौरपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मनसेचे नगरसेवक ललित कोल्हे यांची जळगाव महापालिकेचे 11 वे महापौर म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. केवळ 12 नगरसेवक सोबत असताना त्यांनी महापौरपदापर्यंत मजल मारुन, जुळवाजुळवीच्या राजकारणाचंही उदाहरण त्यांनी समोर ठेवलं.

जळगाव महापालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडीची सत्ता आहे. साधारणपणे प्रत्येक प्रमुख कार्यकर्त्याला संधी मिळावी म्हणून रोटेशन पद्धतीने महापौरपद पाच वर्षे विभागून देण्यात येत असते. याच प्रथेनुसार पक्ष श्रेष्ठींच्या सांगण्यावरुन नुकताच नितीन लद्धा यांनी आपल्या महापौरपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर खान्देश विकास आघाडीच्या नव्हे, तर मनसेच्या ललित कोल्हे यांची वर्णी लागली आहे.

मनसेच्या ललित कोल्हेंना मिळालेली संधी, ही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. विशेष म्हणजे ललित कोल्हे हे बिनविरोध निवडून जाण्यासही यशस्वी ठरले आहेत.

सत्ता स्थापनेच्या वेळी खान्देश विकास आघाडीला मनसेची झालेली मदत पाहता, खान्देश विकास आघाडीकडून मनसेला एक वर्षासाठी महापौरपद प्रदान करण्यात येईल, असे आश्वासन दिले गेले असल्याचे बोलले जात होते. त्याच आश्वासनाचा भाग म्हणून ललित कोल्हे यांची वर्णी लागली.

ललित कोल्हे यांची सर्वच पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी चांगलीच जवळीक असल्याने त्याचा देखील त्यांना फायदा मिळणार आहे.

ललित कोल्हे कोण आहेत?

ललित कोल्हे यांच्या घराण्याला राजकीय वारसा आहे. यासोबतच ललित कोल्हे यांचे व्यक्तिमत्व पूर्व इतिहास पाहता वादग्रस्त राहिले आहे. मागील 10 ते 15 वर्षांचा काळ पाहता त्यांच्यावर शहरातील अनेक पोलीस ठाण्यात विविध गुन्ह्यांची नोंद देखील करण्यात आली आहे. यामध्ये फसवणूक करणे, शस्त्र बाळगणे, धमकी देऊन मारहाण करणे या सारखे गुन्हे देखील दाखल आहेत.

ललित कोल्हे यांना पाच पत्नी असल्याचा दावा देखील ललित कोल्हे यांची पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या मुंबई येथील रुबी कोल्हे नामक एका तरुणीने केला होता. यासंदर्भात मुंबई येथील ओशिवरा पोलीस स्थानकामध्ये तिने कौटुंबिक कलहाची तक्रार दिल्याचे बोलले जात आहे.

विविध गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर 2015 मध्ये ललित कोल्हे यांच्यावर पोलीस दलातर्फे तडीपारीची प्रस्ताव देखील तयार करण्यात आला होता. मात्र त्यांच्यावरील अनेक गुन्ह्यांमध्ये ते न्यायालयात निर्दोष सुटल्याने आणि काही प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असल्याने तो प्रस्ताव पुढे सरकू शकला नाही. सत्तेची चाहूल लागल्यानंतर मात्र ललित कोल्हे हे गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारीपासून दूर असल्याचे चित्र असले तरी त्यांचं व्यक्तिमत्व हे वादग्रस्त राहिले आहे हे मात्र निश्चित.