मुंबई: राज्यात महापालिका निवडणुका न घेता त्या ठिकाणी प्रशासक नेमून महापालिकांचा कारभार देखील आपल्या ताब्यात ठेवण्याचा कट सरकार आखत आहे असा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला होता. याला आता राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. नवाब मलिक यांनी राज ठाकरे यांना उच्च न्यायालयाच्या आदेशांचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला आहे. 


राज्य सरकार कोणत्याही प्रकारे निवडणुका पुढे ढकलून त्या ठिकाणी प्रशासक नेमण्याच्या विचारात नाही. कोरोनाची सध्याची परिस्थिती पाहता तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. याबाबत सर्वच राजकीय पक्षांना सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करू नयेत असं आव्हान मुख्यमंत्र्यांनी केले आहे. कोर्टाचे देखील गर्दी जमावू नयेत असे आदेश आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनी कोर्टाच्या आदेशांचा अभ्यास करावा असा सल्ला नवाब मलिक यांनी दिला आहे. 


याबाबत अधिक बोलताना नवाब मलिक म्हणाले की, "महाराष्ट्रात काही पालिकांची मुदत संपल्यामुळे त्याठिकाणी कोरोनामुळे निवडणुका घेण्यात आलेल्या नाहीत. त्याठिकाणी प्रशासक नेमण्यात आलेला आहे. परंतु कोविड असताना नेमणुकांच्या बाबत जाणूनबुजून कुठेही प्रशासक नेमण्याच्या तयारीत सरकार नाही. परंतु जेव्हा तामिळनाडू, बंगाल येथे निवडणुका झाल्या त्यावेळी दुसरी लाट आली. त्यानंतर न्यायालयातून जे आदेश प्राप्त झाले त्यानुसार निवडणूक आयोगाला जबाबदार धरलं पाहिजे. राजकीय पक्षांवर बोट ठेवण्याचं काम न्यायपालिकांनी केलं. आता सरकार कुठंही प्रयत्नशील नाही प्रशासक नेमून कुठंही पालिका चालवण्याचा आमचा प्रयत्न नाही. कोरोना कमी झाल्यानंतर नक्कीच निवडणुका होतील. ज्यांनी हे आरोप केले आहेत त्यांना वाटतंय की जाणीवपूर्वक हे होत आहे त्यांनी हायकोर्टाच्या आदेशांचा अभ्यास करावा." 


दरम्यान गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार यांच्या पुण्यातील कार्यक्रमाला मोठी गर्दी पाहिला मिळाली होती. त्याठिकाणी कोरोना संबंधित सर्व नियमांची पायमल्ली करण्यात आली होती असा प्रश्न पत्रकारांनी नवाब मलिक यांना विचारला असता नवाब मलिक म्हणाले की, "जिथे गर्दी होत आहे तिथं गुन्हे दाखल होत आहेत. पक्षाकडून स्पष्ट भूमिका घेण्यात आली आहे गर्दी होईल असे कार्यक्रम घेऊ नका. कोरोना अजूनही गेला नाही."


मुंबईत राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे का या प्रश्नावर बोलताना नवाब मलिक म्हणाले की, "बुधवारी सकाळी 9 वाजता मुंबईत वाय बी चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला शरद पवार उपस्थित असणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर जे उमेदवार विधानसभेची निवडणूक लढले आहेत त्या सर्वांना निमंत्रित करण्यात आलं आहे. यामध्ये पराभूत उमेदवारांना देखील बोलावण्यात आलं आहे. या बैठकीत आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने मतदारसंघाचा आढावा घेण्यात येईल."


किसान आंदोलन देशात सुरू आह. उत्तर प्रदेशमध्ये काल मोठा कार्यक्रम झाला. यावेळी त्यांनी 27 सप्टेंबरला भारत बंदची घोषणा केली आहे. आम्ही कृषी कायद्याच्या विरोधात आहोत. आम्ही नेहमी या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. सध्या 27 तारखेच्या संपामध्ये सहभागी व्हायचं की नाही याबाबत पक्षाची अंतर्गत चर्चा झालेली नाही. लवकरच आम्ही याबाबत आमची भूमिका जाहीर करू असंही नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं. 


महत्वाच्या बातम्या :