Raj Thackeray Birthday : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा आज (14 जून) 54 वा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी राज ठाकरेंना भेटायला हजारो कार्यकर्ते त्यांच्या निवासस्थानी येतात. मोठ्या उत्साहात त्यांचा वाढदिवस साजरा होतो. पण यंदा तब्येतीच्या कारणास्तव ते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार नाहीत. मात्र, कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम, उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

मुंबईतील चेंबूरमध्ये 54 रुपये किलो दराने सीएनजी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे. राज ठाकरे यांच्या 54 व्या वाढ दिवसानिम्मित चेंबूरच्या आशिष सिनेमा समोरील सीएनजी गॅस पंपावर मनसेतर्फे 54 रुपये किलो दराने सीएनजी गॅस उपलब्ध करुन देण्यात आला आहे. आज सीएनजी प्रति किलो 76 रुपये आहे. मात्र या पंपावर 54 रुपये किलो दराने मनसेतर्फे सीएनजी उपलब्ध करण्यात आला आहे. मनसेचे उपाध्यक्ष माऊली थोरवे आणि सविता थोरवे यांच्या वतीने ही योजना आज दिवसभर असणार आहे. या पंपावर आज सकाळी राज ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. रिक्षाचालकांच्या हस्ते केक कापून राज ठाकरे यांच्या जन्मदिन साजरा झाला आणि या उपक्रमाचा आरंभ करण्यात आला.

औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 54 रुपये प्रति लिटर पेट्रोलमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 54 व्या वाढदिवसानिमित्त आज औरंगाबादमधल्या क्रांती चौकातील पेट्रोल पंपावर 54 रुपये प्रतिलिटर दराने पेट्रोल मिळत आहे. औरंगाबादमध्ये आज पेट्रोलचा दर 112.41 रुपये प्रति लिटर आहे. परंतु आज काही तास मनसेकडून निम्म्या दरात पेट्रोलचं वाटप केलं जात आहे. मनसे कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी आज हा उपक्रम राबवला असून पेट्रोल पंपावर सकाळपासून रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. सुरुवातीला हा उपक्रम एक तास होता, परंतु गर्दी वाढल्याने हा उपक्रम दोन तास करण्यात आला.

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त संत गजानन महाराज मंदिरात मनसेकडून अभिषेकआज मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा वाढदिवस असल्याने बुलढाणा जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दिवसभर वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. आज पहाटे साडे पाच वाजता मनसे कार्यकर्त्यांनी शेगाव इथल्या संत गजानन महाराज मंदिरात जमून अभिषेक केला. राज ठाकरे यांच्या प्रकृती आणि दीर्घाआयुष्याबद्दल गजानन महाराज चरणी साकडं घातलं. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेकडो कार्यकर्त्यांनी गजानन महाराजांची आरती करुन राज ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य मिळो अशी प्रार्थना केली.