मुंबई : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Union Minister Anurag Thakarur) यांच्या कल्याण (Kalyan) लोकसभा मतदारसंघातील दौऱ्यावरून मनसेचे आमदार राजू पाटील (MNS MLA Raju Patil) यांनी भाजप (BJP) आणि शिंदे गटाला टोला लगावलाय. धनुष्यबान हे चिन्ह शिंदे गटाला मिळालं नाही तर पुढं होणाऱ्या निवडणुका सोयीस्कर व्हाव्यात म्हणून अनुराग ठाकूर यांचा कल्याण दौरा असेल असा टोला राजू पाटील  यांनी लगावलाय. अनुराग ठाकूर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे पुत्र श्रीकांत शिंदे खासदार असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात तीन दिवसाचा दौरा केला. या दौऱ्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. 


अनुराग ठाकूर यांच्या दौऱ्यानंतर चर्चा रंगल्या असतानाच पुढील निवडणुका युतीत लढणार असल्याचं अमित शहा यांनी सांगितलं आहे असं सांगत खासदार श्रीकांत शिंदे यांनी चर्चांना पूर्णविराम दिल्याचे सांगितले. तर दुसरीकडे संघटनात्मक बांधणीसाठी हा दौरा असल्याचं भाजपकडून सांगण्यात येत असलं तरी श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघातील भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्यांमुळे  चर्चा रंगल्या होत्या. याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी भाजपला टोला लगावलाय. "अनुराग ठाकुर यांचा दौरा हा पक्षाचा अंतर्गत विषय आहे, प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार असतो. परंतु, पुढे जाऊन काही कायदेशीर बाबी पण आहेत. उद्या धनुष्यबाण चिन्ह नाही मिळालं तर निवडणुका सोयीस्कर होण्यासाठी हे दौरे असतील असा चिमटा भाजप व शिंदे गटाला राजू पाटील यांनी काढलाय. हा पूर्णतः त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम आहे मी त्यावर जास्त बोलू शकत नाही, कुठलातरी आधार त्यांना घ्यावा लागेल त्यामुळे आसरा शोधत असतील असे राजू पाटील म्हणाले. 
 
"खऱ्या विचारांचं सोनं मनसेच्या पाडवा मेळाव्यालाच"


दरम्यान, दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू झाली आहे. याबाबत देखील राजू पाटील यांनी शिवसेनेला आणि शिंदे गटाला चिमटा खाडलाय. "खऱ्या विचारांचं सोनं हे मनसेच्या पाडवा मेलाव्यालाच लुटलं जातं. पूर्वी दसरा मेळाव्याला विचारांचा सोनं लुटलं जायचं, आता दोन दोन ठिकाणी सोनं काय लुटायचं ते लुटू देत, आमचा पाडव्याला मेळावा सुंदर होतो. पाडव्याच्या दिवशी मनसेचा मेळावा असणार त्यावेळी खऱ्या विचारांचं सोनं आहे. खरे विचार आहेत ते पाडव्याला असतात आणि लोक तिथे भरभरून घेत असतात. त्यावेळी अशी काही ओढा ताण  नसते अस चिमटा यावेळी राजू पाटील यांनी काढला.