मुंबई: राज्यात वेगाने पसरत असलेल्या जनावरांच्या लम्पी चर्मरोगाच्या (Lumpy Skin Disease) संदर्भात राज्यस्तरीय कार्यदलाची निर्मिती करण्यात आली आहे. राज्याच्या पशुसंवर्धन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 10 सदस्यीय कार्यदल स्थापन करण्यात आलं असून लम्पी रोग अटोक्यात आणण्यासाठी नियमित आढावा घेऊन त्यावर उपाययोजना आणि शिफारस हे कार्यदल करणार आहे. 


लम्पी रोग राज्यातील जवळपास 22 जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे. ज्या ठिकाणी लम्पी रोगाची लागण झालेली आहे त्या ठिकाणाहून पाच किमीच्या परिघात सर्व जनावरांचं लसीकरण केलं जाणार आहे. 


कोल्हापुरातील दूध कट्टे बंद ठेऊ नका, उपायुक्तांचे महापालिकेला पत्र 


राज्यातील जनावरांमध्ये लम्पी आजार पसरत असला तरी कोल्हापुरातील दूध कट्टे बंद ठेवण्यात येऊ नयेत असं पत्र जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी कोल्हापूर महापालिकेला दिलं आहे. लम्पी चर्मरोग हा रोग म्हैशींमध्ये आढळून आला नसल्याचा उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आला आहे. कोल्हापुरातील दूध कट्टे ही आपली परंपरा आहे, त्यामुळे ती बंद ठेवण्यात येऊ नये असही या पत्रात म्हटलं आहे.


तातडीने विमा उतरवा, राजू शेट्टींची मागणी 


स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी येत्या 10 दिवसांमध्ये लसीकरणाचा साठा उपलब्ध करून राज्यातील सर्व पशुधनाचे केंद्र आणि राज्य सरकारकडून तातडीने विमा उतरविण्याची मागणी केली आहे.  


नांदेडमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक फटका 


देशातील अनेक राज्यात लम्पी स्कीन आजारानं  थैमान घातलं आहे. त्यामुळं पशुपालक चिंतेत आहे. दिवसेंदिवस लम्पी स्कीनचा धोका वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. लम्पी चर्मरोगामुळं नांदेड (Nanded) जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुहेरी आर्थिक संकट आलं आहे. एकीकडं अतिवृष्टीनं शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडं लम्पी रोगामुळं दुधाच्या जोड धंद्यावरही मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.


जनावरांच्या दुधाचं प्रमाण घटतंय 


लम्पी आजारामुळं जनावरांचं दुधाचं प्रमाण घटत आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. सुरुवातीला बियाणांच्या वाढत्या किंमती, बोगस बियाणं, अतिवृष्टी यामुळं शेती पिकाचं अतोनात नुकसान झालं होतं. तर आता शेतकऱ्यांचा जोडधंदा असणाऱ्या दुग्ध व्यवसावरही गंडांतर आलं आहे. कारण जनावरावरील लम्पी आजारामुळं शेतकऱ्यांना दुभती जनावरे विकण्याची वेळ आली आहे. तर ही जनावरे खरेदीदारही खरेदी करण्यास तयार नाहीत. तर आजारी जनावरांचे दूधही आता बाजारात विकत घेतलं जात नाही.