आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातल्या तीन जागा राष्ट्रवादी सोडाव्यात, अशी मनसेची 'मनसे' इच्छा आहे. त्यात ठाणे, नाशिक आणि मुंबईचा समावेश आहे. मोबदल्यात मनसे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला महाराष्ट्रात साथ देईल, अशी डील होऊ शकते.
मनसेची तीन ते चार जागांची मागणी असली, तरी राष्ट्रवादी मात्र एक-दोन जागांवरच सकारात्मक आहे. राष्ट्रवादीकडून लोकसभेच्या उमेदवारांची यादी जवळपास तयार असून केवळ ठाण्याच्या जागेबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. ही जागा मनसेसाठी सोडली जाऊ शकते. सध्या तरी हे सगळं चर्चेच्या पातळीवर असल्याचं म्हटलं जातं. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे.
एकीकडे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट घेऊन आघाडीत शिरण्याचे संकेत दिले आहेत. त्यातच मनसेही आघाडीच्या गोटात सामील झाली, तर निवडणुकीची रंगत अधिकच वाढू शकते.
नुकतंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने अख्खं पवार कुटुंब मुंबईत आलं होतं. त्याआधी पुण्यात राज ठाकरे यांनी शरद पवारांची प्रकट मुलाखत घेतली होती. याशिवाय 'माझा'च्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमाला येताना दोघांनी एकत्र विमानप्रवासही केला होता. त्यामुळे ठाकरे आणि पवारांची ही जवळीक नवी राजकीय दिशा घेणार का? हाच सवाल आहे.