मुंबई : भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या मुंबई येथील राजगृह या निवासस्थानी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, काँग्रेस नेते आणि विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ आदी नेते उपस्थित होते.


नुकतेच प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली होती. राज्यातील अनेक जिल्ह्यात वंचित आघाडीच्या सभाही पार पडल्या. या सभांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. यानंतर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी प्रकाश आंबेडकर यांना आघाडीत येण्याचं आवाहन करत आहेत.

मात्र एमआयएमला सोबत घेण्यास काँग्रेस-राष्ट्रवादीचा विरोध होता. याविषयी बोलताना ओवेसी म्हणाले होते की, एमआयएम नको असेल तर मी आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस-राष्ट्रवादीमधील महाआघाडीचा मार्ग मोकळा झाला होता.

याच पार्श्वभूमीवर आज आघाडीबाबत चर्चा करण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांमध्ये बैठक पार पडली असल्याचं बोललं जात आहे. या बैठकीत महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची नाव ठरवून पॅनल यादी दिल्लीला पाठवणार असल्याच कळतय. आता बहुजन वंचित आघाडी आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणार का? गेल्यास किती जागा प्रकाश आंबेडकरांच्या पदरात पडणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

काय म्हणाले होते ओवेसी ?
"तुम्ही प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोला, त्यांना हव्या तितक्या जागा द्या. मी एकही जागा लढवणार नाही. वंचित बहुजन आघाडीच्या व्यासपीठावरही येणार नाही. मात्र प्रकाश आंबेडकर यांच्या अटी मान्य करा आणि आघाडी करा. प्रकाश आंबेडकर यांच्या अटी मान्य केल्यास मी स्वतंत्र सभा घेऊन आघाडीचं स्वागत करेन", असं खुलं आव्हान असदुद्दीन ओवेसी यांनी दिलं होतं.