मुंबई : राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा म्हणजे चक्रीवादळाच्या वेगालाही लाजवेल असा होता, पुराणकाळात देवी देवता वगैरे मनोवेगाने फिरायचे तसे तुम्ही फिरलात अशी खोचक टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली.


संदीप देशपांडे हे मुख्यमंत्र्यांवर टीका करताना म्हणाले की, "मुख्यमंत्री साहेब आम्हाला तुमचा अभिमान आहे, चक्री वादळाला लाजवेल असा तुमच्या दौऱ्याचा वेग होता. पुराणकाळात देवी देवता वगैरे मनोवेगाने फिरायचे तसे तुम्ही फिरलात. खरंच तुम्ही बेस्ट सीएम आहात."


मी ट्विटमधून मुख्यमंत्र्यांवर टीका करत नाही तर वस्तुस्थिती सांगतोय असं संदीप देशपांडे म्हणाले. तोक्ते चक्रीवादळ 140 ते 160 किमी वेगाने आले. आता मुंबई आणि सिंधुदुर्ग हे अंतर किती आहे? मुख्यमंत्री किती वेळात सिंधुदुर्गला जाऊन मुंबईला परतले? असा सवालही त्यांनी केला. 


पंतप्रधानांना गुजरातच्या पुढे काही दिसत नाही, मुख्यमंत्र्यांना मुंबई महापालिकेच्या पुढे काही दिसत नाही आणि महाराष्ट्राच्या जनतेला दोघांमध्ये भविष्य दिसत नाही असा टोलाही संदीप देशपांडे यांनी लगावला. 


राज्याचे मुख्यमंत्री हे वर्ल्ड बेस्ट सीएम आहेत आणि आपल्याला अभिमान असला पाहिजे असं सांगत संदीप देशपांडे म्हणाले की, "तुम्हाला वाटतं की मी टीका करतोय, पण खरंच मी कौतुक करतोय. मुख्यमंत्री कोकणात गेले, त्या ठिकाणच्या लोकांच्या व्यथा त्यांनी समजून घेतल्या असतील. रत्नागिरीत तर जिल्हाधिकाऱ्यांकडूनच लोकांच्या व्यथा त्यांनी समजून घेतल्या आहेत."


मुंबई पॅटर्नमध्ये लोकांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू
मुंबई पॅटर्न इतका चांगल्या प्रकारे राबविला की लोकांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला. कोरोना तर सोडाच लोकांचा आगीतही होरपळून मृत्यू झाला. इतका चांगला पॅटर्न जगात कुठे राबविला गेला असेल अशी उपहासात्मक टीकाही संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारवर केली. 


धारावीत सध्या परप्रांतीय आपापल्या राज्यांत गेलेत. तिकडची लोकसंख्या कमी झाली आहे. त्यामुळेच धारावीतील रुग्णसंख्या कमी झाली असून परप्रांतीय जेव्हा परत येतील तेव्हा या पॅटर्न बद्दल बोलूया असं संदीप देशपांडे म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या :