Raj Thackeray on Maharashtra Bhushan Award:  राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नवी मुंबईतील (Navi Mumbai) एमजीएम रुग्णालयात जाऊन उपचार घेत असलेल्या श्रीसेवकांची भेटही घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्य सरकारकडून (Maharashtra Government) हा प्रसंग टाळता आला असता, असं राज ठाकरे (Raj Thackeray News) म्हणाले. तसेच, राजकीय स्वार्थाशिवाय एवढी लोकं बोलावली जातात का? असं म्हणत राज ठाकरेंनी राज्य सरकारला फटकारलं आहे. 


राज ठाकरे बोलताना म्हणाले की, "राज्य सरकारला हा प्रसंग टाळता आला असता. सकाळी या गोष्टी करण्याची गरज नव्हती. सध्या सगळीकडेच उन्हानं वातावरण तापलेलं आहे. अशावेळी एवढ्या लोकांना सकाळी बोलवायचं, हे टाळता आलं असतं. आप्पासाहेबांना ज्यावेळी महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं, हा कार्यक्रम राजभवनावर बोलवून करता आला असता. एवढ्या लोकांना बोलवून हा कार्यक्रम करण्याची आवश्यकता नव्हती. पण झाली ती गोष्ट दुर्दैवी आहे. याप्रकरणी कसं काय कोण कोणाला जबाबदार धरणार ते कळत नाही. सकाळी न करता संध्याकाळी झाला असता कार्यक्रम तर हा प्रसंग टाळता आला असता."


महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाच्या आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात होणाऱ्या मागणीवर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "ही घटना कोणीही जाणीवपूर्वक केलेली नाही. पण तरीही एवढ्या लोकांना न बोलावता राजभवनावरच दरवर्षीप्रमाणे कार्यक्रम झाला असता तर असा प्रसंगच ओढावला नसता." तसेच, या आयोजनामागे राजकीय स्वार्थ होता का? यावर बोलताना राज ठाकरेंनी राजकीय स्वार्थाशिवाय एवढी लोकं बोलावली जातात का? असं म्हणत फटकारलं आहे. 


काही लोक ICU मध्ये आहेत. मी ICU मध्ये जात नाही आणि भेटायला कोणीही जाऊ नये. मला असं वाटतं की, कोणत्या रुग्णालयात कोणालाही ICU मधील रुग्णांना भेटायला पाठवू नये, असं आवाहनही राज ठाकरेंनी यावेळी केलं आहे. 


सोहळा संध्याकाळी का नाही ठेवला? : राज ठाकरे 


राज ठाकरेंनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. ते म्हणाले की, "काल ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान झाला, ही अतिशय आनंदाची बाब आहे. हा पुरस्कार जेव्हा घोषित झाला तेव्हा मी आप्पासाहेबांचं आणि सरकारचं अभिनंदन केलं होतं. पण या सोहळ्याला जे गालबोट लागलं ते टाळता आलं नसतं का? कधी नव्हे ते मुंबईतसुद्धा उष्माघाताच्या बातम्या वाचायला मिळत असताना, इतक्या कडाक्याच्या उन्हात हा कार्यक्रम न करता त्याची वेळ संध्याकाळची असावी हे प्रशासनाला कळलं नाही का?"


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Raj Thackeray on Maharashtra Bhushan Award: सोहळा संध्याकाळी का नाही ठेवला? राज ठाकरेंची राज्य सरकारवर सडकून टीका