राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना राऊत यांनी ट्वीट केलं आहे. 'वाद वादळातही मित्रत्वाचे नाते टिकून राहिले..असे व्यंगचित्रकार..रसिक मनाचे राजकारणी राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..जय महाराष्ट्र…', अशा शब्दात राऊत यांनी राज ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
संजय राऊत हे राज ठाकरे यांचे अत्यंत जुने सहकारी आहेत. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर राऊत शिवसेनेतच राहिले. राज ठाकरे यांनी जरी शिवसेनेपासून वेगळे होत मनसे स्थापत वेगळी राजकीय वाट धरली असली तरी कठीण काळात राज आणि उद्धव यांनी नेहमीच एकमेकांची साथ दिली आहे. राज ठाकरे यांना ईडीने चौकशीला बोलावल्यानंतरही शिवसेना आणि खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंचं उघड समर्थन केलं होतं. तर उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्याला राज ठाकरेंनी आपल्या मातोश्रींसह हजेरीही लावली होती. राऊत यांनी सामनातून राज ठाकरे आणि मनसेवर अनेकदा बोचऱ्या शब्दात टीकाही केली आहे.
कोरोनाकाळात जनतेला मदत करा, ह्याच माझ्यासाठी शुभेच्छा : राज ठाकरे
राज ठाकरे यांनी वाढदिवसाच्या दोन दिवस आधी एक पत्रक जारी करत मला शुभेच्छा द्यायला येऊ नका असे आवाहन केले होते. माझ्या वाढदिवशी तुम्ही सगळे दरवर्षी मला शुभेच्छा द्यायला येता, पण ह्या वर्षीची परिस्थिती वेगळी आहे. कोरोनामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत, कोरोनाबाधितांची संख्या कमी झालेली नाही, थोडक्यात सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे आणि अशा वातावरणात वाढदिवस साजरा करणं अजिबात उचित नाही आणि म्हणूनच पक्षातील सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांना माझा सूचनावजा आदेश आहेत की कोणीही मला शुभेच्छा द्यायला येऊ नका. तुम्ही जिथे आहात तिथे जनतेला मदत करा, दिलासा द्या ह्याच माझ्यासाठी शुभेच्छा आहेत, असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं.
बाळा नांदगावकर म्हणतात हे 'सुदामाचं राजधन'
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी फेसबुक पोस्ट लिहून राज ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. सुदामाची ओळख ही जगाला कृष्णप्रेमामुळे आहे, सुदामा आणि कृष्णाच्या मैत्रीचे दाखले हे हजारो वर्षे झाली तरी सातत्याने लोक अजूनही देत असतात. सुदामाकडे निखळ प्रेमाशिवाय कृष्णाला देण्यासारखे काहीच नव्हते, तरीसुद्धा भगवान कृष्णाचे सुदामा प्रेम हे सगळ्यात जास्त होते. मी सुद्धा आज राजकीय, सामाजिक, वैयक्तिक आयुष्यात जे काही आहे ते साहेबांमुळेच, माझ्याकडे सुद्धा साहेबांना देण्यासारखे म्हणजे माझी "निष्ठा" जी मी कधीच अर्पण केली आहे. मला खुप आनंद आहे की माझी सर्वात मोठी ओळख "राजनिष्ठ" अशीच आहे. साहेबांचा लाभलेला अनेक दशकांचा सहवास, वेळोवेळी त्यांनी दिलेले प्रेम, त्यांनी दाखवलेला मार्ग, या सर्व गोष्टी म्हणजे माझ्यासारख्या सुदामाचे "राजधन". योगायोग असा ही आहे की साहेबांच्या निवासस्थानाचे नाव सुद्धा "कृष्णकुंज"च आहे, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.