बीड : होम क्वॉरंटाईन असणाऱ्या व्यक्तीने घराबाहेर फिरू नये, इतर कोणाच्या संपर्कात येऊ नये असं वारंवार प्रशासनाकडून सांगून सुद्धा अनेक लोक ऐकत नाहीत. याचाच एक परिणाम म्हणून बीडमध्ये असलेल्या एका कुटुंबातील सदस्यामुळे आज बीड शहरातील 12 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. याची दखल घेत बीडच्या शहर पोलीस ठाण्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह चार रुग्णांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


बीड शहरातील मसरत भागांमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबातील व्यक्तीला उपचारासाठी काही दिवसापूर्वी हैदराबादला नेण्यात आले होते. यासाठीची रीतसर परवानगी या कुटुंबाला देण्यात आली होती. मात्र हैदराबादहून परत आल्यानंतर या कुटुंबातील सदस्यांनी होम क्वॉरंटाईन राहिले पाहिजे, असा नियम आहे मात्र त्यानंतर बरेच दिवस यातले काही सदस्य हे घराबाहेर फिरत राहिले.

सुरुवातीला या कुटुंबातील गाडीवरील ड्रायव्हर पॉझिटिव्ह रुग्ण म्हणून निष्पन्न झाला. त्यानंतर त्या कुटुंबातील सगळ्या सदस्यांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या. त्यानंतर एकाच कुटुंबातील चार व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळले. प्रशासनाने रुग्ण आढळतात त्यांचे हिस्टरी चेक करण्याचे काम केलं. मात्र या कामात सुद्धा या सदस्यांनी सहकार्य केलं नसल्याचा ठपका प्रशासनाकडून ठेवण्यात आला आहे.

या कुटुंबातील एका सदस्य तर बीड शहरातील जालना रोडवर असलेली इंडिया बँकमध्ये कामासाठी गेला. त्यानंतर कलेक्टर ऑफिस परिसरामध्ये असलेले रजिस्ट्री कार्यालय या ठिकाणी सुद्धा या व्यक्तीचा वावर पाहायला मिळाला. म्हणूनच प्रशासनाने बँक आणि रजिस्टर ऑफिस सुद्धा सील केले आहे. त्यानंतर या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या इतर कर्मचारी आणि व्यक्तींना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे ज्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने लग्न समारंभांमध्ये सुद्धा हजेरी लावली होती. म्हणून बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये संबंधितांवर गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी चार जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. पोलिस प्रशासनाच्या वतीने लग्न समारंभामध्ये लोक सहभागी झाले होते आणि ज्यांनी त्याचं आयोजन केलं होतं, अशा 50 पेक्षा जास्त लोकांवरती गुन्हा दाखल करण्याचे काम चालू असल्याचे सांगण्यात आले आहे.

इतकेच नाही तर सीसीसी सेंटर येथे शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी आणि स्वॅब घेण्यास मज्जाव केल्याप्रकरणी या कुटुंबाच्या नात्यातील व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हणून ज्या व्यक्ती क्वॉरंटाईन आहेत अशा व्यक्तीने स्वतःला कुटुंबापासून आणि इतर व्यक्तींपासून वेगळी ठेवायचं आहे. जर अशा व्यक्ती इतर लोकांच्या संपर्कात राहील या त्यांच्यावरही गुन्हा दाखल होऊ शकतो हेच बीड मधील या घटनेतून समोर आलं आहे.