खडसेंसोबत व्यासपीठ टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा जळगाव दौरा रद्द?
चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव | 30 Mar 2018 05:33 PM (IST)
एका व्यासपीठावर खडसेंबद्दल विचारणा होईल, या भितीनं मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमाला बगल दिल्याची चर्चा आता जळगावात रंगते आहे.
जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जळगाव दौरा अचानक रद्द झाल्यानं अनेक चर्चांना उधाण आलं आहे. दौरा रद्द केल्याचं कारण अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं असलं, तरी माजी महसूलमंत्री मंत्री एकनाथ खडसे यांच्यासोबत व्यासपीठ टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा दौरा रद्द केल्याचं बोललं जात आहे. सकाळी 11 वाजता जिल्ह्यातल्या विविध कामांचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार होतं. या कार्यक्रमाला एकनाथ खडसेंसह सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे हेही उपस्थित राहणार होते. तसेच, दुपारी 12 वाजता पद्मश्री अप्पासाहेब पवार कृषी उच्च तंत्रज्ञान पुरस्काराचा कार्यक्रम होता. या समारंभातही शरद पवारांसोबत एकनाथ खडसेही उपस्थित राहणार आहेत. एका व्यासपीठावर खडसेंबद्दल विचारणा होईल, या भितीनं मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमाला बगल दिल्याची चर्चा आता जळगावात रंगते आहे.