मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जळगावचा नगरसेवक चांगलाच अडचणीत आला आहे. कारण ललित कोल्हेविरोधात पत्नीने तक्रार दाखल केली असून, याप्रकरणी खुद्द उपराष्ट्रपतींनी याची दखल घेत, गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

 

काय आहे प्रकरण?

"ललित कोल्हे हा रंगेल स्वभावाचा असून, त्याची पाच लग्न झाली आहेत. इतकंच नाही तर मुंबईतील एका बारबालेशी त्याचे संबंध आहेत. त्याने माझी फसवणूक केली असून, मला मारहाण केली आहे" असा आरोप, कोल्हेच्या पाचव्या बायकोने केला आहे.

 

ललित कोल्हेची बायको भक्तीने आपलं गाऱ्हाण थेट उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्याकडे मांडलं. यानंतर उपराष्ट्रपतींनी तातडीने दखल घेत, जानेवारी महिन्यातच जुहू पोलिसांशी संपर्क साधून, गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

 

भक्ती कोल्हे यांनी पतीविरोधातील सर्व पुरावे जमा करुन, उपराष्ट्रपतींच्या निदर्शणास आणून दिलं. त्यानंतर उपराष्ट्रपतींनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार ललित कोल्हेविरोधात फसवणूक आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

दुसरीकडे ललित कोल्हेने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

 

27 जानेवारी 2004 रोजी लग्न

 

एका कार्यक्रमादरम्यान 2003 मध्ये भक्ती आणि ललित यांची भेट झाली होती. या भेटीनंतर त्यांची ओळख वाढली आणि त्याचं रुपांतर प्रेमप्रकरणात झालं. या दोघांनी मग 27 जानेवारी 2004 रोजी लग्न केलं.

 

लग्नाच्या रात्रीच दुसऱ्या बायकोचा फोन

 

ज्या दिवशी लग्न झालं, त्याच रात्री भक्तीला एक फोन आला. फोनवरील आवाज एका महिलेचा होता. भक्तीने विचारपूस केली असता, त्या महिलेने आपण ललित कोल्हेची पत्नी असल्याचं सांगितलं. या प्रकारामुळे धक्का बसलेल्या भक्तीला आपली फसवणूक झाल्याचं लग्नाच्या पहिल्याच दिवशी समजलं.

 

आणखी एक बायको

 

हादरुन गेलेल्या भक्तीचे मग ललितसोबत वादविवाद सुरु झाले. यांचा वाद महिला दक्षता आयोगापर्यंत पोहोचला. आयोगाने दोघांमध्ये सामोपचार घडवला. मात्र दोघांमध्ये धुसफूस सुरुच होती. भक्तीने मग ललितबाबत अधिक माहिती जमवली असता तिला आणखी एक धक्का बसला. कारण त्याच्या आणखी एका बायकोचा शोध लागला होता.

 

नवऱ्याविरोधात तक्रार

 

भक्ती आणि ललित तीन वर्ष एकत्र राहिले, मात्र वाद विकोपाला गेल्यानंतर भक्ती मुंबईला परत आली. तर आई आजारी असल्यामुळे ललित जळगावातच राहिला. इकडे मुंबईत भक्तीने ललितविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर, ललितनेही घटस्फोटासाठी अर्ज केला.

 

पहिलं लग्न

 

भक्तीच्या मते, ललितने 2001 मध्ये हर्षल नावाच्या महिलेशी पहिलं लग्न केलं. या दोघांना मुलगा असून, तो सध्या 16 वर्षांचा आहे. हर्षलने मात्र 2008 मध्येच आत्महत्या केल्याचं भक्तीने सांगितलं.

 

ललितला पहिली अटक

 

हर्षलच्या मृत्यूनंतर ललितला जळगाव पोलिसांनी पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून अटक केली होती, असं भक्तीने सांगितलं. मात्र त्याची याप्रकरणात सुटका झाली होती.

 

दुसरं लग्न

 

ललितने मेघा घाडे नावाच्या मुलीशी 2002 मध्ये लग्न केलं होतं, त्यांना 14 वर्षांची साक्षी नावाची मुलगी आहे.

 

तर ललितने 2003 मध्ये निधी नावाच्या मुलीशी लग्न केल्याचा दावा भक्तीने केला. ललित यावरच थांबला नाही तर त्याने 2004 मध्ये पूजा होले नावाच्या तरुणीशी विवाह केला. तर माझ्याशी 27 जानेवारी 2004 रोजी लग्न केल्याचं भक्तीने सांगितलं.

 

सांताक्रुझमधील बारबालेशीही नवऱ्याचे संबंध

 

ललितचा कारनामा इथेच थांबलेला नाही तर सध्या तो सांताक्रुझमधील एका बारमध्ये काम करणाऱ्या सुकन्या भट्टाचार्यच्या प्रेमात पडल्याचा दावा भक्तीने केला आहे.

 

भक्तीची पोलिसात धाव

 

ललितविरोधातील सर्व पुरावे गोळा करुन भक्तीने पोलिसात धाव घेतली. भक्तीने आधी भ्रष्टाचारविरोध आणि गुन्हे प्रबंध कौन्सिलचे अध्यक्ष मोहन क्रिष्णन यांची भेट घेतली. त्यांनीच तिला उपराष्ट्रपतींना पत्र लिहिण्यास सांगितलं. याशिवाय क्रिष्णन यांनीच तिला माहिती अधिकारामार्फत ललितविरोधात पुरावे गोळा करण्यास मदत केली.

 

ललितचे आरोप

 

दरम्यान, ललितने स्वत:वरील आरोप फेटाळून लावतानाच, भक्तीवर गंभीर आरोप केले आहेत. भक्तीचा वेश्या व्यवसायात समावेश असून, तिच्याविरोधात माझ्याकडे पुरावे आहेत. ती कोलकात्यातील रेड लाईट एरियात मुलींची विक्री करते, असा सनसनाटी आरोप ललितने केला आहे.

 

याशिवाय भक्तीविरोधात मी अगोदरच फॅमिला कोर्टात खटला दाखल केला असून, कलम 498A अर्थात कौटुंबिक हिंसाचार सिद्ध करुन दाखवण्याचं आव्हान मी दिलं आहे, असंही ललितने म्हटलं आहे.