दाभोलकर हत्या : 'तावडेंनी मला पिस्तुल बनवण्यास सांगितलं होतं'
एबीपी माझा वेब टीम | 20 Jun 2016 07:16 AM (IST)
कोल्हापूर: महाराष्ट्राला हादरवरुन सोडणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणाचा तपास कासव गतीनं सुरु असल्याचा आरोप होत आहे. दाभोलकरांच्या हत्याप्रकरणाला ज्याच्यामुळे वेग मिळाला, ज्यानं दाभोलकरांच्या हत्येबाबत महत्वाचा तपशील दिला, त्या साक्षीदाराने पहिल्यांदाच एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिली. दाभोलकरांची हत्या, त्यात सारंग अकोलकर, वीरेंद्र तावडे यांची भूमिका असे अनेक पदर साक्षीदार संजय साडवीलकर यांनी एबीपी माझाला उलगडून दाखवले आहेत. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांचं रेखाचित्र जेव्हा मी पहिल्यांदा पाहिलं, तेव्हाच मी सारंग अकोलकरला ओळखलं होतं. त्याबाबत मी पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्कही केला. मात्र मला गाभिर्यानं घेतलं गेलं नाही, असा दावा साडवीलकर यांनी केला आहे. याशिवाय दाभोलकर हत्याप्रकरणात अटक करण्यात आलेला डॉ. वीरेंद्र तावडे हा मला 2004 पूर्वीच भेटला होता. हिंदुत्ववादी म्हणून आम्ही परिचीत होतो. आम्ही एकत्र काम करत होतो. मात्र काही काळानंतर आमच्या भेटीत खंड पडला. अचानक 2008-09 च्या दरम्यान तावडे पुन्हा भेटीला आला. त्यांनी मला पिस्तुल बनवायचं असल्याचं सांगितलं. तसंच दोन आक्रमक मुलं हवी, त्यांना प्रत्येकी दहा लाख रुपये देऊ आणि त्यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी आम्ही स्वीकारु, असा प्रस्ताव दिला होता, अशी माहिती साडवीलकर यांनी दिली. इतकंच नाही तर दोन मुलं माझ्याकडे पाठवली होती, त्यांची राहण्याची सोय करण्यास मला सांगितलं होतं. त्यावेळी मी त्यांना विचारलं, या मुलांवर केसेस आहेत का, तर त्यांनी नाही असं सांगितलं. मात्र त्यांना कोल्हापुरात काही गोष्टी सर्च करायच्या आहेत, जसे की कोण सकाळी फिरायला कधी जातं, कोणत्यावेळी घरातून बाहेर पडतं, अशी माहिती जमा करायची होती, अशी माहिती तावडेने पाठवलेल्या माणसाने दिल्याचं, साडवीलकरांनी सांगितलं. VIDEO: