Raj Thackeray : शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या वादावर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच जाहीर वक्तव्य केले आहे. शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या वादामुळे मनाला प्रचंड वेदना झाल्या असल्याचे राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात म्हटले. शिवसेनेचा धनुष्यबाण या गटाकडे की त्या गटाकडे हे पाहून त्रास झाला असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. इतकी वर्षे शिवसेना पाहिली, जगलो होतो. अनेकांच्या घामातून, रक्तातून शिवसेना उभी राहिली असल्याचे त्यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गेल्यानंतर राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच वक्तव्य केले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी भाषणाच्या पहिल्याच मिनिटात शिवसेना बंडखोरीच्या वादावर भाष्य केले. आज शिवतीर्थावर मोठी गर्दी आहे. कोणीतरी आपल्याला संपलेला पक्ष म्हटले होते. ज्यांनी संपलेला पक्ष म्हटले त्यांची आजची अवस्था काय आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. राज ठाकरे यांनी पुढे म्हटले की, पक्षातून बाहेर पडलो त्यावेळी माझा वाद हा विठ्ठलाशी नव्हे तर त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे असे म्हटले होतो. ही चार टाळकी पक्ष खड्ड्यात घालणार, त्यात मला वाटेकरी व्हायचं नाही असेही म्हणालो होतो याची आठवण राज यांनी करून दिली.
फक्त धनुष्यबाण नव्हे तर शिवधनुष्यबाण
राज ठाकरे यांनी शिवसेना निवडणूक चिन्ह धनुष्यबाणाच्या वादावर भाष्य केले. तो धनुष्यबाण नव्हता तर शिवधनुष्यबाण होता असे राज ठाकरे यांनी म्हटले. बाळासाहेबांशिवाय कोणालाही शिवधनुष्यबाण झेपणार नाही असेही त्यांनी म्हटले. एकाला झेपलं नाही आणि दुसऱ्या झेपल की नाही माहित नाही असा टोलाही राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना नाव न घेता लगावला.
उद्धव यांना लहान भावाबद्दल आपुलकी नाही: नांदगावकर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर मोठा आरोप केला आहे. उद्धव ठाकरे यांना लहान भावाबद्दल कधीही आपुलकी वाटली नाही. त्यामुळेच त्यांनी युतीचा प्रस्ताव नाकारला असल्याचा गौप्यस्फोट नांदगावकर यांनी सभेला संबोधित करताना केला. दोन भाऊ एकत्र यावे अशी इच्छा होती, असेही नांदगावकर यांनी म्हटले. मनसेच्या जाहीर सभेला संबोधित करताना बाळा नांदगावकर यांनी ठाकरे गटावर टीकास्त्र सोडले. बाळा नांदगावकर यांनी म्हटले की, दोन भाऊ एकत्र यावे अशी इच्छा होती. 2017 मध्ये युतीचा प्रस्ताव घेऊन आपण मातोश्रीवर गेलो होतो. त्यावेळी सुभाष देसाई, अनिल परब, अनिल देसाई, राहुल शेवाळे, मिलिंद नार्वेकर आदी उपस्थित होते. त्यावेळी तुम्ही मोठा भाऊ, आम्ही लहान भाऊ अशी भूमिका घेतली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी युतीला नकार दिला. तुमच्या मनात लहान भावाबद्दल आपुलकी नव्हती, वैषम्य वाटत होते अशी घणाघाती टीका नांदगावकर यांनी केली.