Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर मोठा आरोप केला आहे. उद्धव ठाकरे यांना लहान भावाबद्दल कधीही आपुलकी वाटली नाही. त्यामुळेच त्यांनी युतीचा प्रस्ताव नाकारला असल्याचा गौप्यस्फोट नांदगावकर यांनी सभेला संबोधित करताना केला. दोन भाऊ एकत्र यावे अशी इच्छा होती, असेही नांदगावकर यांनी म्हटले.
छत्रपती शिवाजी पार्क मैदानावरील मनसेच्या जाहीर सभेला संबोधित करताना बाळा नांदगावकर यांनी ठाकरे गटावर टीकास्त्र सोडले. बाळा नांदगावकर यांनी म्हटले की, दोन भाऊ एकत्र यावे अशी इच्छा होती. 2017 मध्ये युतीचा प्रस्ताव घेऊन आपण मातोश्रीवर गेलो होतो. त्यावेळी सुभाष देसाई, अनिल परब, अनिल देसाई, राहुल शेवाळे, मिलिंद नार्वेकर आदी उपस्थित होते. त्यावेळी तुम्ही मोठा भाऊ, आम्ही लहान भाऊ अशी भूमिका घेतली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी युतीला नकार दिला. तुमच्या मनात लहान भावाबद्दल आपुलकी नव्हती, वैषम्य वाटत होते अशी घणाघाती टीका नांदगावकर यांनी केली.
नाशिकमध्ये मनसेची सत्ता आल्यानंतर राज ठाकरे यांच्या नेतृत्वात आम्ही बदल घडवला. माझ्या नेत्याबद्दल अभिमान वाटतो, असे नांदगावकर यांनी म्हटले. मुंबई महापालिकेला तुम्ही काय दिलं असा सवाल नांदगावकर यांनी केला.
मुंबईत पर्यटकांना दाखवण्यासाठी गेलं काय, 45 हजार कोटींचा अर्थसंकल्प असताना मुंबई महापालिकेला काही देत नसाल तर याचा अर्थ तुमचं नेतृत्व निष्फळ ठरलं आहे असेही नांदगावकर यांनी म्हटले,
...तर शिवसेना फुटली नसती
आपल्याच सहकाऱ्यांचे खच्चीकरण करण्याची सवय शिवसेना ठाकरे गटाच्या नेतृत्वाला आहे. त्यामुळेच आज पक्षाचे आमदार, खासदार पक्ष सोडून गेले. राज ठाकरेंच्या हाती पक्ष असता तर शिवसेना फुटली नसती, असा दावाही मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केला.
राज ठाकरेंच्या भाषणातील संभाव्य मुद्दे कोणते?
येत्या काळात मुंबई महापालिकेची निवडणूक होणार असून त्यासाठी मनसेने तयारी सुरू केली आहे. मनसेने या आधी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला असून त्यावरून भाजपशी त्यांची जवळीकता वाढत असल्याचंही दिसून येतंय. राज ठाकरेंची आजची सभा ही मनसेच्या आणि राज्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारी ठरेल असं मत काहीजणांनी व्यक्त केलं आहे.
सौदी अरेबियात रमजानच्या महिन्यात मशिदीवरील भोंग्यावर बंदी आणली आहे, मग महाराष्ट्रात हा निर्णय का घेतला जात नाही अशी त्यांनी भूमिका मांडली आहे. मनसेच्या टीजरमध्येही याची झलक दिसून आली. त्यामुळे राज ठाकरे आज मशिदींच्या भोंग्यावर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर राज ठाकरे यांचा हा पहिलाच पाडवा मेळावा आहे. त्यामुळे ते काय बोलणार, कुणावर टीका करणार याकडे लक्ष लागलं आहे. तसेच शिवसेनेतील फूट आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.