मुंबई : काल दिग्दर्शक राजू सापते आत्महत्या प्रकरणानंतर चित्रपट सृष्टीतील कलाकार, कला दिग्दर्शक, मेकअप आर्टिस्ट, रंगभूषाकार यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राजू सापते आत्महत्या प्रकरणात योग्य न्याय मिळावा, अशी घटना परत होऊ नये , सोबतच चित्रपट सृष्टीतील परप्रांतीय मुजोरीविरोधात आज राज ठाकरे यांच्याशी या सर्व कलाकारांनी भेट घेऊन चर्चा केली.
यावेळी कलाकारांवर दादागिरी करणाऱ्या अलाइड मजदूर युनियनमधून सदस्य म्हणून राजीनामा देऊन एक नवी युनियन स्थापन करावी. त्यात कुठलाही प्रकराचा राजकीय हस्तक्षेत असू नये, अशी युनियन स्थापन करावी, असं या चर्चेदरम्यान राज ठाकरे यांनी कलाकारांना सूचवलंय. शिवाय, कोणीही युनियनच्या नावखाली शूटिंग बंद करत असेल किंवा दादागिरी करत असेल, तर तिथे मनसे स्टाईल उत्तर दिले जाईल, असं अमेय खोपकर यांनी सांगितलं.
अगोबाई सूनबाई, काय घडलं त्या रात्री, मन्या द वंडर बॉय, साटंलोटं, राजधानी एक्स्प्रेस आदी चित्रकृतींचे कलादिग्दर्शक राजू सापते यांनी शुक्रवारी रात्री राहत्या घरी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ करून त्यांनी हे टोकाचे पाऊल आपण का उचलत आहोत याचं कारण दिलं. मनोरंजनसृष्टीत काम करणाऱ्या मजदूर युनियन्सचे अधिकारी राकेश मौर्य आपल्याला पैशावरून वारंवार धमकावत असल्याचं कारण देत आपल्या समोर आता काहीच पर्याय उरला नसल्याने आपण आत्महत्या करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या व्हिडिओमुळे मराठी मनोरंजनसृष्टीत खळबळ उडाली आहे.
कलादिग्दर्शक राजू सापते यांची आत्महत्या; मनोरंजनसृष्टीतली युनियन्सची दहशत पुन्हा उघड
आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात राजू सापते यांनी काय म्हटलं?
- राजू सापते यांनी 2 जुलैला आत्महत्येपूर्वी हे पत्र लिहिलं आहे.
- पत्रात त्यांनी राकेश मौर्य, गंगेश्वर श्रीवास्तव, नरेश विश्वकर्मा या नराधमांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.
- या पत्रात नमूद केल्याप्रमाणे कामगार युनियनचं एकe मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश राजू सापते यांनी केला आहे.
- मुंबईच्या उपनगरात आऊटडोअर चित्रिकरण असेल तर एक शिफ्टचे दीड शिफ्ट पेमेंट कामगारांना करावं असा युनियनचा नियम आहे. पण नरेश विश्वकर्मा उर्फ नरेश मिस्त्री यांनी सांगितल्या प्रमाणे गंगेश्वर श्रीवास्तव यांना 1 लाख रूपये दिले तर या कामगारांना एक शिफ्टचेच पैसे द्यावे लागतील असं सुचवल्याचं सापते यांनी या पत्रात म्हटलं आहे.
- तीन वर्षापूर्वी ब्रह्मांड स्टुडिओत नरेश यांच्या म्हणण्याप्रमाणे एक लाख रुपये गंगेश्वर यांना दिल्यानंतर कामगारांना एक शिफ्टचे पैसे देऊनही युनियनची मंडळी फिरकली नसल्याचं यात म्हटलं आहे.
- त्यानंतर नायगावमध्ये दशमी क्रिएशन्सच्या सेटवर कामगारांना एक शिफ्टचे पैसे देऊन अतिरिक्त एक लाख रुपये द्यायला मी नकार दिल्यानंतर युनियनची लोकं लगेच सेटवर आल्याचा दाखला सापते यांनी दिला आहे.
- दरम्यानच्या काळात नरेश मिस्त्री यांना काम न देता संतोष मिस्त्री यांना काम दिल्यानंतर नरेश यांनी दिलेल्या त्रासाचे दाखलेही या नोटमध्ये आहेत.
- गेली आठ वर्षं नरेश विश्वकर्मा यांनी धमक्या देऊन आपल्याकडून युनियनसाठी आणि स्वत:साठी पैसे घेतल्याचं यात सापते यांनी नमूद केलं आहे.
- सापते पत्रात म्हणातात, नरेश मिस्त्री यांनी 1 जूलैला युनियनच्या ऑफिसमध्ये आपल्याला ब्लॅकमेल केलं. यापुढे भविष्यात मला काम दिलं तरंच मी तुम्ही माझे सर्व पैसे दिल्याचं मी खरंखरं सांगेन असं त्यांनी मला सांगितलं. मी ते मान्य केल्यावर त्यांनी मी सगळे पैसे दिल्याचं युनियनमध्ये सांगितलं.
- कोणत्या कामगाराचे पैसे मी देणं बाकी आहे, असा प्रश्न सापते यांनी राकेश मौर्य यांना केल्यानंतर त्यांनी ते व्यक्तिगत पातळीवर घेऊन ‘तीन-चार वर्षांचं सांगू शकत नाही, आताचं सांगतो’ असं म्हणत‘, आता पाहतो तुमचं काम कसं चालू होतं ते’, असं धमकावलं. तसेच माझा एकही कामगार तुमच्याकडे काम करणार नाही, असंही सांगिल्याचं सापते यांनी लिहिलं आहे.
- माझ्याकडे तीन स्टुडिओचं काम आहे हे कळल्यावर मौर्य यांनी माझ्याकडे 10 लाख रुपयांची मागणी केली होती. शिवाय प्रत्येक प्रोजेक्टमागे एक लाख रुपयांची मागणी केली. मी ते अमान्य केलं म्हणून ही सगळी चौकशी सुरू झाल्याचा गौप्यस्फोट सापते करतात.
- लेबर युनियनची दादागिरी वाढते आहे. ते सेटवर येऊन काम थांबवतात. राकेश मौर्य यांच्या गळ्यात सौन्याच्या चेन कशा येतात. ड्रायव्हर, गाडी कशी येते? कामगार, कलादिग्दर्शक, निर्माते यांची पिळवणूक चालली आहे.
- या सर्व बाबींचा निषेध म्हणून मी माझं जीवन संपवत आहे. नरेश विश्वकर्मा, गंगेश्वर श्रीवास्तव, राकेश मौर्य यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी. माझ्या कुटुंबाचं होणारं आर्थिक नूकसान या तिघांकडून भरून घ्यावं असं सांगतानाच माझी आत्महत्या वाया जाऊ देऊ नका असंही सांगितलं आहे.
राकेश मौर्यने राजू सापते यांचा खून केलाय, त्याच्यावर कारवाई करा; मनसे नेते अमेय खोपकर यांची मागणी