मुंबई : शिवसेना केसाळ कुत्र्यासारखी आहे. कुठून बघायचं हेच कळत नाही. शिवसेनेला स्वत: ची भूमिका राहिली नाही, अशी जळजळीत टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेवर केली. तसेच, पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरुन राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला.


शिवसेनेवर टीकास्त्र

शिवसेनेने ‘भारत बंद’वर टीका केली. त्यावरील प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरेंनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, “शिवसेना केसाळ कुत्र्यासारखी आहे. कुठून बघायचं हेच कळत नाही. शिवसेनेला स्वत: ची भूमिका राहिली नाही.” तसेच, राज ठाकरे पुढे म्हणाले, “शिवसेनेला स्वतःची भूमिका राहिली नाही. ह्यांची पैश्याची कामं अडली की हे सत्तेतून बाहेर पडायची धमकी देतात आणि कामं झाली की सत्तेत राहतात.”

महाराष्ट्र सैनिकांचं अभिनंदन

“महाराष्ट्र सैनिकांनी आज उत्तम आंदोलनं केली. मी माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं अभिनंदन करतो. त्यांनी सतत असा जागता पहारा ठेवला पाहिजे.”, असे म्हणत राज ठाकरेंनी ‘भारत बंद’मध्ये सहभागी मनसैनिकांचे अभिनंदन केले.

भाजपला इशारा

“आज महाराष्ट्र सैनिकांवर ज्या पद्धतीची कलमं टाकली गेली, ती पाहून मला भारतीय जनता पक्षाला सांगावसं वाटतं की, आज तुम्ही सत्तेत आहात, उद्या तुम्ही विरोधात असाल. याचा आम्ही समाचार घेऊच, पण भाजपच्या अंगलट हे येणार नक्की”, असा इशारा राज ठाकरेंनी भाजपला दिला.

लोकांचा आक्रोश दिसून आलाय”

“रविशंकर प्रसाद म्हणाले की पेट्रोल डिझेलचे भाव कमी करणं आमच्या हातात नाही. मग 2014 च्या आधी तुम्ही यासाठी का बंद पुकारला होतात? पेट्रोल डिझेलच्या भावाने उच्चांक गाठला आहे, रुपयाने निचांक गाठलाय आणि तरीही त्याची भाजपला लाज नाही वाटत. लोकांचा आक्रोश दिसून आलाय.”, असे राज ठाकरे म्हणाले.

...म्हणून ‘भारत बंद’ला पाठिंबा : राज ठाकरे

“भारत बंद कोणत्या पक्षाने पुकारला होता हे महत्वाचं नाही. कारण पेट्रोल आणि डिझेलची भाववाढ हा विषय महत्वाचा आहे आणि या दरवाढीमुळे महागाई सर्वत्र वाढली आहे आणि म्हणून हा विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही बंदमध्ये सामील झालो.”, अशी भूमिका राज ठाकरेंनी मांडली.

तसेच, “नोटबंदी, जीएसटी फसली आणि त्यामुळे अर्थव्यवस्था गाळात गेली आणि ती बाहेर काढायला मोदी पेट्रोल-डिझेलवर वाट्टेल तेवढे कर लावत सुटलेत.” असा आरोप राज ठाकरेंनी मोदी सरकारवर केला.

निवडणुका जिंकायच्या त्यातून पैसे कमवायचे आणि पुन्हा निवडणुका जिंकायच्या हाच भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा आहे, असाही गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला.

देशाचा प्रमुख हा राजा असावा, व्यापारी नसावा, असा टोलाही राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.

राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :

  • माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आज उत्तम आंदोलन केलं - राज ठाकरे

  • आजचा बंद कुणी पुकारला, हे महत्वाचं नाही, पेट्रोल-डिझेल हा विषय महत्वाचा आहे - राज ठाकरे

  • पेट्रोल-डिझेलचे दर सरकारच्या हातात नाही, मग भाजप विरोधात असताना का आंदोलन करत होती? - राज ठाकरे

  • लोकांचा रोष महाराष्ट्रभर दिसून आला - राज ठाकरे

  • ज्या प्रकारचं राजकारण भाजप खेळतंय, हे त्यांच्याही अंगलट येईल - राज ठाकरे

  • परिणाम दिसायला बाहेर यावं लागतं, राज ठाकरे यांचा शिवसेनेला टोला

  • शिवसेनेला स्वत:ची भूमिका नाही - राज ठाकरे

  • शिवसेनेला स्वत:ची भूमिका नाही, त्यामुळे त्यांना भाव देण्यात काही अर्थ नाही - राज ठाकरे

  • पैश्याची कामं अडली की शिवसेना सत्तेतून बाहेर पडायची धमकी देते आणि कामं झाली की सत्तेत राहते - राज ठाकरे

  • शिवसेनेची अवस्था केसाळ कुत्र्यासारखी - राज ठाकरे

  • देशाचा प्रमुख राजा असावा, व्यापारी नसावा - राज ठाकरे

  • नोटाबंदी, जीएसटी फसल्याने लोकांच्या खिशात हात - राज ठाकरे

  • हे (मोदी सरकार) काँग्रेसपेक्षा वाईट आहेत, खास करुन दोन माणसं, म्हणजे मोदी आणि शाह  - राज ठाकरे

  • लोकांच्या सुख-दु:खाशी शिवसेनेला काहीही घेणं-देणं नाही - राज ठाकरे


VIDEO : राज ठाकरे यांची संपूर्ण पत्रकार परिषद