Sanjivraje Naik Nimbalkar : आपल्याला साम, दाम, दंड भेद सगळे वापरा असे दिल्लीतील नेत्यांनी सांगितले आहे. मात्र, त्यांनी काहीही वापरले तरी आपण स्वाभिमानी आहोत. सातारा हा स्वाभिमानी आहे आणि दिल्लीवर राज्य करणारा सातारा जिल्हा आहे. त्यामुळे दिल्लीसमोर आम्ही झुकणारे नाही. भाजपचे वरिष्ठ नेते वेगळ्या प्रकारचे राजकारण करत आहेत. त्यामुळे आपल्याला वेगळा निर्णय घ्यावा लागला त्यामुळे महाराष्ट्र आणि देशाला पवार साहेबाशिवाय पर्याय नसल्याची प्रतिक्रिया संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली. 



आमदार दीपक चव्हाण आणि संजीवराजे नाईक निंबाळकरांनी तुतारी फुंकली 


फलटण- कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण आणि संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला. दरम्यान, आमदार रामराजे नाईक निंबाळकर सध्या तरी शांत राहणार असले तरी महायुतीचा प्रचार ते करणार नाहीत. उमेदवारी जाहीर केल्यानंतर दीपक चव्हाण यांनी तुतारी फुंकल्याने सातारमध्ये अजित पवार गटाला तगडा झटका बसला आहे. आमदार दीपक चव्हाण आणि संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, धैर्यशील मोहिते पाटील, विजयसिंह मोहिते पाटील आदींच्या उपस्थितीत तुतारी फुंकली. यावेळी मनोगत व्यक्त करताना संजीवराजे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.


शरीराने एका बाजूला होतो आणि मनाने एका बाजूला 


संजीवराजे म्हणाले की, फलटण, माळशिरस, माण तालुक्यातील पाणी दुसरीकडे नेण्याचा जो प्रयत्न केला जात आहे, त्याला आळा घालण्यासाठी आपण हा निर्णय घेतला आहे. रामराजे, रघुनाथराजे आणि माझे राजकारण अपक्ष म्हणून सुरू झाले. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. शरीराने एका बाजूला होतो आणि मनाने एका बाजूला होतो हे तुम्हाला माहिती आहे. 


ते पुढे म्हणाले की, मुळात आम्ही हा निर्णय घेण्याऐवजी कार्यकर्त्यांनी घेतलेला निर्णय आहे. त्यामुळे आपण शरद पवार साहेबांसोबत जाण्याचा निर्णय आपण घेतला आहे आणि त्याला तुमच्या सगळ्यांचा होकार आहे असे मी गृहीत धरतो. तुतारी चिन्ह माहिती नव्हते. मात्र,  शरद पवार साहेब, विजयसिंह दादा यांच्यामुळे सर्वांना माहित झाले. 


इतर महत्वाच्या बातम्या