सांगली  : वाघाचे एकही लक्षण मुख्यमंत्र्यामध्ये दिसत नाही, आम्ही खरा वाघ या अधिवेशनात बघायला उत्सुक आहे. अधिवेशनाच्या मुद्यावरुन सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आव्हान दिले आहे.  हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावरून सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकार, शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. 


"मुख्यमंत्री महालातून बाहेर या आणि महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न जाणून घ्या. अधिवेशनातून पळ काढणाऱ्यांना वाघ म्हणत नाही. वाघ हा डरकाळ्या फोडत  जात असतो. वाघाचे एकही लक्षण मुख्यमंत्र्यामध्ये दिसत नाही. प्रत्येकवेळी वाघ बिळात जाऊन बसतोय, बिळातून बाहेर या आणि खरा वाघ दाखवा, आम्ही खरा वाघ या अधिवेशनात बघायला उत्सुक आहे",  असे म्हणत आमदार सदाभाऊ खोत यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना पूर्ण अधिवेशन घेण्याची मागणी केली आहे. 


गेल्या 2 वर्षात सरकार अधिवेशनातून सारखं पळ काढत आहे. यंदाच अधिवेधन देखील ओमायक्रॉनच्या पाठीवर बसून आलंय. पाच दिवसाचे हे अधिवेशन घेत आहेत. देशाचे अधिवेशन  महिनाभर सुरू राहते आणि महाराष्ट्रचे अधिवेशन फक्त 5 दिवस का? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.


आपण केलेला  भ्रष्टाचार अधिवेशनात बाहेर येईल आणि अनेकांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लागेल, ही महाविकास आघाडीच्या नेत्यांना भीती वाटत आहे. या भीतीपोटी हे सरकार सातत्याने कोरोनाच्या भूताच्या मागे लपून बसत आहे. हे सरकार म्हणजेच कोरोनाचे भूत झाले असा टोलाही सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



संबंधित बातम्या :