कोल्हापूर :  महापूर काळात कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयाग चिखलीच्या ग्रामस्थांनी मदत म्हणून दिलेले अन्न टाकून दिले, मदत हिसकावून घेतली, तंबाखूच्या पुडीची मागणी केली, बोटीच्या जवानांना उद्धट वागणूक दिली, अशा खोट्या पोस्टमुळे व्यथित झालेल्या चिखलीकरांच्यावतीने चिखलीच्या सर्वपक्षीय स्थानिक नेत्यांनी एकत्र येऊन चिखलीकर ऋणी आहे, मस्तवाल नाही आणि कधीही असणार नाही त्यांना समजून घ्यावे असे निवेदन प्रसिद्ध केले.

 

चिखली गावाला 2019 साली अभूतपूर्व महापूराने पुरतेच बुडवले. त्यानंतर 2020 साली नित्याच्या महापुरा बरोबरच कोरोना महामारीने वर्षभर घरी बसवले.. सलग दोन वर्षे पीक कुजले, दूध व्यवसाय संपला, छोटे-मोठे व्यवसाय आणि मुलांच्या नोकऱ्या ही गेल्या, तरीही "चिखलीकर" कसातरी जगतच होता... मात्र पुन्हा एकदा यंदा आलेल्या महापुराने अवघ्या दहा तासात होत्याचे नव्हते केले...अशा महा संकटाच्या खाईत सापडलेल्या चिखलीकरांना समजून घ्या मदत राहूदे मात्र फक्त लढ म्हणून ताकद देणारे शब्द हवेत. 

 

अनेक वेळा सोशल मीडियावर चिखलीकरांनी अन्न टाकून दिले.  चिखलीकराने तंबाखूची पुडी मागितली. मदत करण्यासाठी आलेल्या बोटीतील जवानांना चिखलीकर उद्धट बोलतात. शासनाने दिलेले भूखंड चिखलीकर आणि विकून खाल्ले. सोशल मीडियातील या आणि अशा चुकीच्या पोस्टमुळे संकटकाळी संपूर्ण महाराष्ट्राने केलेल्या मदतीमुळे ऋणी असलेला चिखलीकर मनातून खचत आहे. एखाद्या न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना सारखी अवस्था आम्हा चिखलीकर यांची झालेली आहे. 

 

संपूर्ण महाराष्ट्राने आम्हाला भरपूर मदत केलेली आहे. त्यातून आम्ही अजून उतराई झालेलो नाही हेही मान्य आहे. मात्र आमचा चिखलीकर उद्धट , मग्रूर, लाचार, बेजबाबदार, ऐतखाऊ, असल्याबाबतचे आमची बदनामी करणारे काही चुकीचे मेसेज पोस्ट बातम्या सोशल मीडिया मधून व्हायरल होत आहेत. त्यामुळे सर्वांचा ऋणी असणारा चिखलीकर आणखीच व्यतीत होत आहे..तरी त्या चिखलीकरांना समजावून घ्या त्यांच्या वरील संकटाचे गांभीर्य लक्षात घ्यावे... असे कळकळीचे निवेदन प्रयाग चिखलीच्या स्थानिक नेत्यांनी गावाच्या वतीने प्रसिद्धीस दिले आहे.

 

 

यासंदर्भात स्थानिक नेत्यांनी घेतलेल्या बैठकीत गोकुळचे संचालक एस आर पाटील, भाजपाचे संभाजीराव पाटील, रघुनाथ पाटील, माजी सरपंच- केवलसिंग रजपूत, धनाजी चौगले यांनी मते मांडली...बदनामीकारक पोस्ट व्हायरल करू नये अन्यथा उध्वस्त झालेला पूरग्रस्त संपून जाईल असे कळकळीचे असे आवाहन केले.