सोलापूर : राज्यात कोरोनाची दुसरी लाट अद्यापही पूर्णपणे ओसरलेली नाहीये. अशात तिसऱ्या लाटेची शक्यता देखील तज्ञांकडून व्यक्त होतेय. त्यामुळे राज्यात अद्यापही कोरोनाचे निर्बंध कायम आहेत. सोलापूर जिल्ह्यात देखील संध्याकाळी 4 नंतर सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. तर शनिवार- रविवारी तर संपूर्ण दिवस लॉकडाऊन प्रशासनाच्यावतीने लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र या सगळ्या नियमांना खुद्द लोकप्रतिनिधीची हरताळ फासत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. 


 

बार्शी विधानसभेचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या दोन्ही मुलांचे लग्न काल बार्शीत पार पडले. लक्ष्मी सोपान बाजार समितीचे चेअरमन, आमदार राजेंद्र राऊत यांचे सुपुत्र रणजित राऊत यांचा तसेच त्यांचे बंधू रणवीर राऊत यांचा विवाह सोहळा काल संध्याकाळी 6.45 वा. गोरज मुहुर्तावर पार पडला. अंत्यत थाटामाटात झालेल्या या विवाह सोहळ्यासाठी हजरोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हते. सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा या लग्न सोहळ्यात उडालेला होता. 

 

विशेष म्हणजे आमदार राजेंद्र राऊत हे भाजप समर्थक असल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे अनेक आमदार, पदाधिकारी देखील या लग्न सोहळ्यासाठी उपस्थित होते. भाजप आमदार माजी मंत्री सुभाष देशमुख, आमदार राम सातपुते, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान अवताडे, आमदार रणजित मोहिते पाटील, आमदार प्रशांत परिचारक, शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर, माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे अनेक पदाधिकारी देखील या लग्नाला उपस्थित होते. एकीकडे भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, गिरीष महाजन यांच्यासारखे नेते पूरग्रस्त भागात जाऊन लोकांचे अश्रू पुसण्याचे काम करत असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष मात्र लग्न सोहळ्यात उपस्थिती लावत आहेत. या लग्न सोहळ्यात कोरोनाविषयक नियमांची अक्षरश: पायमल्ली होत आहे. 

 

दरम्यान हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या या सोहळ्या प्रकरणात बार्शी शहर पोलिसात गन्हा देखील दाखल कऱण्यात आला आहे. योगेश मारुती पवार या व्यक्तिविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. योगेश पवार यांनी या लग्न सोहळ्याला परवानगी मिळावी यासाठी बार्शी पोलिसात अर्ज केलेला होता. केवळ 50 लोकांच्या उपस्थिती लग्न कार्य करण्यास हरकत नसल्याची लेखी समज पोलिसांनी योगेश पवार यांना दिली होती. मात्र प्रत्यक्षात हजारोंच्या संख्येने लोक या लग्न सोहळ्यास हजर राहिल्याने पोलिसांनी केवळ योगेश पवार यांच्याच विरोधात आय़ोजक म्हणून गुन्हा नोंदविला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या लग्नात वेगळा न्याय आणि आमदारांच्या मुलांच्या लग्नात वेगळा न्याय असे का असा सवाल बार्शीतील सामाजिक कार्यकर्ते दिनानाथ काटकर यांनी उपस्थित केला आहे.