धुळे : एसटी महामंडळातील रोजंदारी कर्मचाऱ्यांना लॉकडाऊन काळात देण्यात आलेलं पेमेंट हे त्यांच्या हजर दिवसांपेक्षा अधिक दिलं असण्याची शक्यता आहे. त्यामुळे एसटी प्रशासनानं अशा कर्मचाऱ्यांना लॉकडाऊन काळात रोजंदारी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या पगाराची सविस्तर माहिती सर्व विभागातून तातडीनं मागवली आहे. त्यामुळे रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून एक तर वसुली अथवा वेतनात कपात होण्याची शक्यता असल्यानं एसटीच्या रोजंदारी कर्मचारी वर्गात असंतोष पसरला आहे. तर दुसरीकडे कामगारांबद्दल कळवळा दाखवणाऱ्या संघटना गप्प असल्यानं रोजंदारी कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
एसटी महामंडळाच्या रोजंदारी क्रमांक एकवर काम करणाऱ्या चालक, वाहक, यांत्रिक, लिपिक, टंकलेखक यांना लॉकडाऊन काळात दिलेल्या वेतनाची माहिती मध्यवर्ती कार्यालयानं मागवल्यान लॉकडाऊन काळात दिलेल्या वेतनाची कपात या कामगारांकडून केली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महामंडळाने दिनांक 22 जून रोजी पत्र क्रमांक 1805 नुसार संपूर्ण विभागातून रोजंदारी गट क्रमांक एक यांनी मार्च 2020 ते एप्रिल 2020 अखेर या काळातील हजर दिवस आणि त्या महिन्यात अदा करण्यात आलेली वेतनाची माहिती, तसेच प्रत्यक्ष हजर दिवसा व्यतिरिक्त इतर दिवसांची आदा केलेलं वेतन यांची संपूर्ण माहिती 23 जून रोजी मध्यवर्ती कार्यालयाने मागविली आहे. सदर रक्कम या कामगारांकडून वसूल करण्यात येईल असंही बोलले जात आहे.
पाहा व्हिडीओ : एसटी कर्मचाऱ्यांना 50 लाखांचं विमा कवच, परिवहन मंत्री अनिल परब यांची घोषणा
मात्र रोजंदारी गट क्रमांकवर सध्या काम करीत असलेल्या परंतु 180 दिवस लॉकडाऊन पूर्वी भरून रोजंदारी गट क्रमांक दोन, म्हणजे तात्पुरत्या समय वेतन श्रेणीसाठी पात्र आहेत. अशा कामगारांना विभागीय कार्यालयांच्या हलगर्जीपणामुळे आस्थापना आदेश देण्यात आले नाहीत. रोजंदारी गट क्रमांक 2 साठी पात्र असूनही कागदोपत्री ते रोजंदारी गट क्रमांक एक वरच दिसत असल्यानं या कामगारांकडून वेतन कपात केली गेली तर तो त्यांच्यावर अन्याय ठरेल म्हणून लॉकडाऊन पूर्वी 180 दिवस पूर्ण करणाऱ्या कामगारांना रोजंदारी गट क्रमांक दोनचं आस्थापना आदेश पारित करण्याबाबत मध्यवर्ती कार्यालयाने आदेश द्यावेत, अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे. लॉकडाऊन पूर्वीच 180 दिवस पूर्ण झालेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांची माहिती अद्यावत करण्याची जबाबदारी ही एसटी प्रशासनाची असताना या कामात ज्यांनी दिरंगाई केली त्यांच्यावर कारवाई न होता एसटी प्रशासनाचा हा निर्णय उंटावरून शेळी हाकण्याचा प्रकार असल्याची चर्चा एसटीच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांमध्ये सुरु आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
लॉकडाऊनमध्ये काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करा, एसटी कामगार संघटनांची मागणी
एसटी कंडक्टरचा मुलगा बनला डेप्युटी कलेक्टर, रविंद्र शेळके राज्यात दुसरा
कोरोनामुळे एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास 50 लाखांची मदत, परिवहन मंत्री अनिल परब यांची घोषणा