सोलापूर : पुलवामामध्ये दहशतवाद्यांसोबत लढतान शहीद झालेले सोलापुरातील सुनील काळे अनंतात विलीन झाले आहेत. लष्करी इतमामात त्यांच्यावर पानगाव या त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे मोठे बंधू नंदकिशोर काळे आणि मुलाने त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. पाणावलेल्या डोळ्यांनी आणि जड अंत:करणाने सुनील काळे यांना शोकाकूल अखेरचा निरोप देण्यात आला.


सीआरपीएफ, तसंच ग्रामीण पोलिसांनी शहीद सुनील काळे यांना मानवंदना दिली. सुनील काळे यांना निरोप देण्यासाठी आरपीएफचे महानिरीक्षक संजय लाटकर, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार राजेंद्र राऊत, जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते.



जम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील बंदजू परिसरात मंगळवारी (23 जून) पहाटे दहशतवाद्यांशी चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. मात्र दहशतवाद्यांशी लढताना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पानगावमधील सुनील दत्तात्रय काळे (वय 41 वर्ष) शहीद झाले. काळे यांच्या निवृत्तीला काहीच महिने शिल्लक होते मात्र त्यांनी आपली सेवा वाढवून घेतली होती. तसंच त्यांची बदली देखील दिल्लीला झाली होती. मात्र ते लॉकडाऊनमुळे ते तिकडं जाऊ शकले नाहीत.


सुनील काळे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, आई, दोन भाऊ, एक विवाहित बहिण असा परिवार आहे. सुनील काळे हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांना शेतीची आवड होती. परिवाराची तसेच आपल्या मित्रांची काळजी घेणारे अशी त्यांची ओळख. त्यांची सुट्टी मंजूर होती, पण ते लॉकडाऊनमुळे येऊ शकले नाहीत, त्यांनी नवीन घर बाधलं, ते अद्याप तिथं राहायलाही गेले नाहीत, त्याआधीच ही दुर्दैवी घटना घडली असं त्यांच्या मित्रांनी सांगितलं. त्यांच्या शहीद होण्याचे वृत्त कळताच पूर्ण पानगाव बंद करण्यात आलं होतं.


संबंधित बातमी


पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यात बार्शी तालुक्यातील जवान शहीद, दोन दहशतवाद्यांना कंठस्नान


Martyred Sunil Kale | शहीद सुनिल काळे यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार