MLA Chandrakant Jadhav Death : Kolhapur : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांचे आज (दिनांक 2) सकाळी हैदराबाद येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने कोल्हापूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. ते मूळचे कोल्हापूर येथील असले तरी त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात एक यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जात होते. उत्तम फुटबॉलपट्टू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रकांत जाधव यांना कोल्हापुरातील फुटबॉल खेळाचा पाठिराखा म्हणून ओळखले जात होते. कोल्हापुरातील तालमींशी त्यांचे खूप घनिष्ठ नाते होते. कोल्हापुरात तालीम, पेठा असल्याने तालमीच्या मुलांना फुटबॉल खेळासाठी जाधव यांचे नेहमीच प्रोत्साहन राहिले होते.


जाधव यांचे सामाजिक कार्य मोठे होते. त्यांच्या निधनाने एक सच्चा सामाजिक कार्यकर्ता गमावल्याची भावना कोल्हापूरकर व्यक्त करत आहेत. कोल्हापूरकरांचे फुटबॉलवर विशेष प्रेम आहे. या खेळाला प्रोत्साहन मिळावे आणि कोल्हापुरातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्थरावर कोल्हापूरचे नाव करता यावे या हेतूने चंद्रकांत जाधव फुटबॉलच्या स्पर्धा भरवत असत.


उद्योजक म्हणून यशस्वी कारकीर्द 


चंद्रकांत जाधव हे 2019 मध्ये पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले. तेव्हापासून त्यांनी कोल्हापुरातील उद्योग वाढिसाठी विशेष प्रयत्न केले. 2019 मध्ये राजकारणात आले असले तरी त्याआधी ते एक यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जात होते. जाधव यांची जाधव इंडस्ट्रीज, प्रेमला पिक्चर्स, जाधव टूल्स, जाधव बेवरेजेस, जाधव मेटल्स, प्रेमला  इंडस्ट्रीज असे उद्योग होते.


पहिल्याच निवडणुकीत मोठे यश 


चंद्रकांत जाधव यांनी २०१९ मध्ये काँग्रेसच्या चिन्हावर कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी सलग दोनवेळा आमदार राहिलेल्या आणि शहरात चांगली लोकप्रियता असलेल्या शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांचा पराभव केला. विधानसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय त्यांनी अगदी निवडणूक जवळ आल्यानंतर जाहीर केला होता. तरीही प्रचारासाठी खूप कमी कालावधी हातात असताना जाधव यांनी उत्तम नियोजन करून तगड्या विरोधकाला पराभवाची धूळ चारली आणि आपला विजय साकार केला.


साधी राहणी


चंद्रकांत जाधव यांना कोल्हापुरात अण्णा याच नावाने ओळखले जात होते. मोठ्या उद्योग समुहाचे मालक असतानाही जाधव यांची राहणी अगदी साधी होती. तालीम संस्था, गणेश मंडळे, शरहातील पेठा यांच्यासह मतदारांमध्येही ते सहज वावरत असत. त्यांची साधी राहणीच कोल्हापूरकरांना भावली आणि त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी केले.


सामाजिक कार्य


आपले उद्योग सांभाळत जाधव सामाजिक कार्यासाठीही वेळ देत असत. शिक्षण, आरोग्य यासह खेळाडुंना मदत करत असत. याबरोबरच जिल्ह्यातील गरजुंच्या मदतीला धावून जाणारा सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची जास्त ओळख होती.


दोन वेळा कोरोनावर मात 


चंद्रकांत जाधव यांना दोन वेळा कोरोनाची लागण झाली होती. दोन्ही वेळी कोरोनावार यशस्वी मात केली परंतु, गेल्या काही दिवसांपासून त्यांना पुन्हा त्रास होत असल्याने उपचारासाठी हैदराबाद येथे दाखल केले होते. उपचार सुरू असतानाच आज सकाळी त्यांचे निधन झाले.


दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा