VIDEO | पोलिसाच्या उद्दामपणावर आमदार भालकेंचा संताप | पंढरपूर | एबीपी माझा
पुलवामा हल्ल्यानंतर मंदिर परिसरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी पोलिसांनी मोहीम सुरु केली होती. पंढरपुरात ही मोहीम चालवताना एका महिला विक्रेत्याला पोलिसांकडून मारहाण झाल्याने हे विक्रेते संतप्त होते. त्यांनी थेट आमदार भालके यांच्याकडे तक्रार केल्यावर आमदार भालके तिथे पोहोचले. मात्र सुरुवातीला शांतपणे सुरु असलेल्या चर्चेत पोलीस अधिकारी विश्वास साळोखे यांनी महिला विक्रेत्याचा अरेतुरे बोलण्यास सुरुवात केल्यावर भालके भडकले. यातच साळोखे डोक्यावर टोपी न घालता आणि शर्टाची काही बटणं उघडी ठेवून भालके यांचेशी बोलू लागल्यावर भालके यांनी त्यांना तुझी टोपी कुठे आहे असे विचारले. यावर या अधिकाऱ्याने उद्दामपणास सुरुवात केली.
यानंतर भालके यांनी थेट 'मी तुझा बाप आहे, बुक्कीत दात पाडीन'अशा भाषेत बोलण्यास सुरुवात केल्याने परिस्थिती चिघळली. यानंतर भालके यांच्या विरोधात तब्बल 7 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर पोलीस अधिकाऱ्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे त्रास झालेले व्यापारी लोकसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकणार असल्याचे पत्र निवडणूक आयोगाला देणार आहेत.