नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं एकेरी नाव घेत तुझ्यासारखा नमक हराम पूर्ण दुनियेत सापडणार नाही, असं वक्तव्य प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी नाशिकमध्ये केले आहे. नाशिकच्या सिन्नर फाट्यावरील उपकृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली कांदा परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.


सध्या निवडणुकांचे वारे आहे, जातीची समीकरणं आहेत बहुजन वंचित आघाडी स्थापन झाली. पण जो सर्वात वंचित आहे त्या शेतकऱ्याची तिथे चर्चा मात्र होत नाही, अशी टीका बच्चू कडू यांनी वंचित आघाडीवर केली.

सरकार कोणाचेही असो आम्ही मे महिन्यात कांदा जीवनावश्यक वस्तूमधून वगळावा या मागणीसाठी केंद्रीय कृषीमंत्र्यांना मोजके शेतकरी नेऊन घेराव घालणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली आहे. येत्या 2 दिवसात आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊ आणि कांद्याच्या प्रश्नावर योग्य निर्णय घेऊ, असंही ते म्हणाले.

नरेंद्र मोदी नंदुरबारच्या सभेत मागे एकदा बोलले होते की मी तुमचा कांदा खाल्ला आहे, त्यामुळे माझं सरकार आलं. म्हणून मी तुमचं नुकसान होऊ देणार नाही. पण मोदीला आता आठवण करून द्यावी लागणार आहे. तुझ्यासारखा नमक हराम पूर्ण दुनियेत सापडणार नाही, अशा तीव्र शब्दात त्यांनी मोदींवर टीका केली.

रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना साले म्हणले होते. त्यामुळे आम्ही त्यांचा बदला घेणारच. आपण स्वतःही मैदानात उतरायला तयार आहोत किंवा अर्जुन खोतकरांवा पाठीबा देऊ पण दानवेंना पाडणार. यापुढे शेतकऱ्यांचा अवमान करणाऱ्या नेत्यांना धडा शिकवायलाच पाहिजे, असं बच्चू कडू म्हणाले.

परिषद आटोपताच बच्चू कडू यांना स्टेजवर निवेदने देण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी झाल्याने स्टेजचा काही भाग तूटल्याची घटना घडली. मात्र सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.