कोल्हापूर : पुलवामा हल्ल्यात शहीद झालेले जवान हे राजकीय बळी आहेत असा घणाघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. कोल्हापुरातल्या एका कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या दोन गट पडले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची चौकशी करा, सर्व सत्य बाहेर पडेल असंही राज ठाकरे म्हणाले.


40 शहीद जवान राजकीय बळी ठरले
पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानचं पाणी रोखण्याचा इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. यावर पाकिस्तानचं पाणी तोडायला नळातून पाणी देणार आहात का असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला. ते म्हणाले की, इंटरनॅशनल वॉटर अॅक्ट नावाची गोष्ट असते की नसते? दोन-तीन देशातून जाणारं पाणी एक देश थांबवू शकतो का? पण सतत वातावरण उभं करायचंपाकिस्तान एक शस्त्रू आहे. हल्ल्यात जे 40 जवान गेले, त्याची माहिती पुढे येईलच, पण ते राजकीय बळी ठरले आहेत.

VIDEO | अजित डोवाल यांची चौकशी करा, सत्य बाहेर येईल : राज ठाकरे | कोल्हापूर | एबीपी माझा



अजित डोभाल यांची चौकशी करा
भारताचे सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांची चौकशी करण्याचा मुद्दा राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. "आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या दोन गट पडले आहेत. अजित डोभाल या एका माणसाची कसून चौकशी झाली ना तर सगळ्या गोष्टी बाहेर पडतील. हे काय प्रकरण होतं, काय प्रकरण घडलंय? राफेल विसरावं, नोटाबंदीत झालेला गैरव्यवहार विसरावा यासाठी हे सुरु आहे", असा दावा राज ठाकरे यांनी केला.

निवडणुकीदरम्यान मोठी घटना घडवली जाईल
निवडणुकीदरम्यान काहीतरी मोठं घडवलं जाणार, असं भाकित राज ठाकरे यांनी वर्तवलं. ते म्हणाले की, "मी आज एक गोष्ट सांगतो, निवडणुकीच्या तोंडावर किंवा मध्यात अशीच एखादी मोठी घटना घडवली जाईल. तुमचं लक्ष त्याकडे वळवलं जाईल. जेणेकरुन चार-साडेचार वर्षातील भ्रष्टाचाराच्या गोष्टी विसरुन जाल. अशाप्रकारच्या कोणत्याही गोष्टी हे घडवू शकतात. आपली स्मरणशक्ती कमी असते. त्यामुळे या गोष्टी घालवायच्या आणि हिंदुस्थान वर्सेस पाकिस्तान एवढ्या गोष्टी, एक शत्रू उभा करायचा. या गोष्टी गेली अनेक वर्षे अमेरिका करत आहे."

संस्थांमध्ये दोन गट
देशातील संस्थांविषयी राज ठाकरे म्हणाले की, "आताच्या सरकारमध्ये जी परिस्थिती निर्माण झालीय ती कधी पाहिली नव्हती. सगळ्या संस्था मग वर्तमानपत्र, वृत्तवाहिन्या, असो किंवा सीबीआय, आरबीआय, पोलीस, आर्मी यात दोन गट झाले आहेत. हे लक्षण चांगलं नाही. बातम्या कशा दिल्या जातात, पसरवल्या जातात, छापल्या जातात, अनेकांना माहित नसतं.

मतदारांची सहनुभूती मिळवण्यासाठी देशवासियांच्या देशभक्तीशी खेळ करुन सरकार जवानांचा बळी घेत आहे. असाच राज ठाकरे यांचा एकंदरीत सूर आहे, ज्याचं भाकित राज ठाकरे यांनी चार महिन्यांपूर्वीच मुंबईतल्या विक्रोळीच्या सभेत केलं होतं.

दरम्यान राज ठाकरे यांच्या दाव्यावर विविध पक्षातल्या नेत्यांनी सावध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

VIDEO | राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर शरद पवारांची टीका | नवी मुंबई | एबीपी माझा



राजकारण न करण्यास मी बांधिल : शरद पवार
शरद पवार म्हणाले की, "पुलवामा हल्ला झाल्यानंतर सर्व राजकीय पक्षांची बैठक लावली होती. या बैठकीला सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख हजर होते. मात्र या बैठकीत भाजपचे प्रमुख नेते हजर नव्हते. संरक्षण मंत्रीही हजर नव्हते. त्यामुळे हे गंभीर प्रकरण आहे. भाजपाचे मंत्री हजर असले तरी ते सरकारी प्रतिनिधी म्हणून होते.या बैठकीत ठराव करुन सर्वानुमते हल्ल्याचा निषेध केला आहे. त्याचबरोबर याचं राजकारण न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने मी याला बांधिल आहे. काश्मीरच्या सर्वसामान्य लोकांना विश्वास देण्याची गरज आहे. यातून वाद वाढतील, असं व्यक्तव्य होऊ नये. काश्मीरमधील काही घटक यात असल्याचे सांगितलं जात होतं. ते भारतीय आहेत. बाहेरच्यांची मदत घेऊन कोणी काही करत असल्यास त्या तरुणांना चुकीच्या मार्गावरुन बाहेर आणलं पाहिजं."

सुरुवातीला जनभावना लक्षात घेऊन पुलवामा हल्ल्यावर सगळ्यांनीच मौन बाळगलं. पण कालांतराने या हल्ल्यावर आणि काश्मीरमधल्या स्थितीवर आता दबक्या आवाजात का होईना चर्चा सुरु झाली आहे.