'नायक'मधल्या अनिल कपूरसारखं मी एक दिवसाचा मुख्यमंत्री झालो, तर पहिलं काम अपंग, अनाथ, जवान आणि शेतकऱ्यांसाठी करेन, असे आमदार बच्चू कडू म्हणाले. एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात आमदार बच्चू कडू यांनी सार्वजनिक आणि वैयक्तिक जीवनातील गोष्टींवर मनमोकळा संवाद साधला.
"सत्तेत दरोडेखोर, विरोधातले महादरोडेखोर"
सत्तेतले दरोडेखोर, तर विरोधातले महादरोडेखोर आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात शेतकऱ्यांवर गोळीबार केला, हे आता संघर्षयात्रा काढतायेत, त्यांनीच पाप केलं आहे, असे म्हणत बच्चू कडूंनी सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षातील काँग्रेस-राष्ट्रवादीवरही जोरदार टीका केली. शिवाय, विरोधकांचा संघर्ष नाहीच, डायरेक्ट यात्रा काढली, अशी टीका बच्चू कडू यांनी विरोधकांच्या संघर्ष यात्रेवर केली.
"सदाभाऊ सत्तेत रमणार नाहीत, ते बाहेर पडतील"
सत्तेत जाऊन, मंत्री होऊन लोकांसाठी काम करायला आवडेल का?, या प्रश्नाला उत्तर देताना बच्चू कडू म्हणाले, "सदाभाऊंचं काय झालं हे तुम्ही बघता आहातच. सदाभाऊंसारखा एवढा चांगला नेता असल्या माणसांच्या जाळ्यात बसलाय हे बघवत नाही." मात्र, यावेळी बच्चू कडू यांनी दावा केला की, सदाभाऊ खोत सत्तेत जास्त दिवस रमणार नाहीत, ते बाहेर पडतील.
राजू शेट्टी, सदाभाऊ खोत मंत्रिपदाचा राजीनामा देऊन आंदोलनात आले तर स्वागत, मी त्यांचा सैनिक म्हणून काम करेन, असेही बच्चू कडू म्हणाले.
शेतकरीविरोधी धोरणांवर टीकास्त्र
कसायापेक्षा कलम वाईट आहे, तलवार शंभर जणांना कापेल, पण धोरण ठरवणारे कोट्यवधींना मारु शकतात, असे म्हणताना, बच्चू कडू म्हणाले, "2 लाख 15 हजार कोटी बजेटपैकी 1 लाख कोटी सरकारी अधिकाऱ्यांना देतो. मग शेतकऱ्यांना का नाही, मुख्यमंत्र्यांची मानसिकता नाही."
अधिकाऱ्यांच्या भावना शेतकऱ्यांप्रती चांगल्या नाहीत, असेही ते म्हणाले.
आमदार बच्चू कडू यांचे 'माझा कट्टा'वरील महत्त्वाचे मुद्दे :
- सत्तेतला प्रश्न दरोडेखोर, विरोधातले महादरोडेखोर - आ. बच्चू कडू
- काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात शेतकऱ्यांवर गोळीबार केला, हे आता संघर्षयात्रा काढतायेत, त्यांनीच पाप केलंय
- गरीब, शेतकरी, अपंग, महिलांसाठी आजपर्यंत कोणतंही सरकार नाही
- अधिकाऱ्यांच्या भावना शेतकऱ्यांप्रती चांगल्या नाहीत
- विरोधकांचा संघर्ष नाहीच, डायरेक्ट यात्रा काढली
- शेतकऱ्यांबद्दल नवतरुणांची तळमळ आशादायी. काही तरुण सेल्फीसाठीपण आले, काही सोबत आले
- लोकांच्या डोक्यात धर्म आणि जातीपेक्षा शेतकरी आला, तरच शेतकऱ्याची दिशा बदलेल
- लोकांच्या डोक्यातील धर्म आणि जात काढून शेतकरी घुसवतोय
- गर्व से कहो हम हिंदू है त्यापेक्ष गर्व से कहो हम किसान है, हे मला करायचं आहे
- माझ्या आसूड यात्रेच्या भितीपोटी विरोधकांनी संघर्षयात्रा काढली
- म. फुलेंच्या शेतकऱ्यांचा आसूड यावरुन आसूड यात्रा सुचली.
- आसूड केवळ बैलावर मारुन उपयोग नाही, तो सरकारवरही चालवावा लागतो.
- आमदार होण्यापूर्वीपासून शेतकऱ्यांसाठी आंदोलनं. चक्का जाम आंदोलन हे लोकांपासूनच शिकलो
- आपल्या लोकांचा चक्काजाम करायचा नाही, तर मंत्र्यांचा चक्काजाम करायचा हे शिकलो
- शाळेत होतो, गावात ऑर्केस्ट्रा आलेला, परीक्षेच्या काळात हे सुरु होतं, त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होईल म्हणून पहिलं आंदोलन केलं.
- त्यावेळी वर्गणी काढून ऑर्केस्ट्रा वाल्यांची उपासमार होऊ नये म्हणून पैसे दिले
- वडील शेतकरी, शेकडं होतं, आता अँम्बुलन्स आहे, पूर्वी रुग्णांसाठी आमचं शेकडं होतं
- कबड्डी खेळताना एका मुलाला रक्ताची उलटी झाली, त्याच्या उपचारासाठी मुंबईला यायचं होतं. त्यावेळी ऐकलेलं मुंबईला जपून जा, तिकडे चोर असतात. आम्ही रक्तदान करुन मित्राचा जीव वाचवला
- त्यावेळी मुंबईला पेशंट आणायचं असेल, तर सर्वजण बच्चूकडे यायचं
- पोरापोरांनी ठरवलं विधानसभा लढवायचं. अर्ज भरण्यासाठी पैसे नव्हते. त्याची बातमी झाली. बातमी वाचून लोक जमा झाले, लोकवर्गणीतून पैसे भरले, निवडणूक लढवली, निवडून आलो.
- माझ्यासारखा फाटका माणूस राजकारणात टिकून आहे, ही लोकांची पुण्याई
- माझ्यामागे जात नाही, नेता-अभिनेता नाही, तरीही लोकांमुळे मी राजकारणात टिकून
- नवनवी आंदोलनं केली. रक्तदान करुन, वृक्षलागवड करु, टाकीवर चढून आंदोलन केली
- आंदोलनाचा लोकांना त्रास नाही, पोलिसांचा त्रास नाही, आंदोलन एकटा माणूसही करु शकतो
- आम्ही सगळ्याच सरकारी अधिकाऱ्यांना मारतो असं नाही. ज्यांना मारलंय त्यांना हळूच मारलंय
- ज्यांनी कायदा मोडलाय त्यांच्यासाठी कायदा हातात घेतलाय
- सातवा वेतन, आमदार पगारवाढ शक्य आहे, तर हमीभाव देणं का शक्य नाही
- 60 वर्षात लुटलं, म्हणून त्यांना दरोडेखोर म्हणतो
- आमच्या डोक्यावरचा बोजा कमी करा, मग हमीभाव द्या
- शिवसेनेचं चित्र वाघ आहे, त्यांनी तुरीबाबत आक्रमकपणा दाखवावा, मांजर होऊ नये
- हरियाणात सरकार हमीभाव देऊन गहू खरेदी करतं, तिथे आंदोलन होतं नाही, मग या सरकारला का जमत नाही
- सरकार आत्महत्या करत नाही, त्यांची हत्या होते
- कसायापेक्षा कलम वाईट, तलवार शंबर जणांना कापेल, पण धोरण ठरवणारे कोट्यवधींना मारु शकतात
- 2 लाख 15 हजार कोटी बजेटपैकी 1 लाख कोटी सरकारी अधिकाऱ्यांना देतो. मग शेतकऱ्यांना का नाही, मुख्यमंत्र्यांची मानसिकता नाही
- राजू शेट्टी, सदाभाऊ खोत मंत्रिपदाचा राजीनामा देऊन आंदोलनात आले तर स्वागत, मी त्यांचा सैनिक म्हणून काम करेन
- मला नेता नव्हे तर कार्यकर्त्या म्हणून काम करायचं आआहे
- एक दिवसाचा मुख्यमंत्री झालो तर पहिलं काम अपंग, अनाथ, जवान आणि शेतकऱ्यांसाठी करेन
- पक्षात गेल्यास गुलाम व्हावं लागेल, आता आम्ही जनतेचं गुलाम आहे
- सदाभाऊंचं काय झालं हे तुम्ही बघता
- सदाभाऊंसारखा एवढा चांगला नेता असल्या माणसांच्या जाळ्यात बसलाय हे बघवत नाही
- सदाभाऊ जास्त दिवस रमणार नाही, बाहेर पडेल
- व्यक्तीगत जीवन वाढलंय, त्याऐवजी सार्वजनिक जीवन वाढलं पाहिजे.
- मस्जिद-मंदिराची उंची वाढवण्यापेक्षा अपंग बांधवांच्या घराची उंची वाढवा
- हुंडा हे कारण नाही, धोरण हे कारण
- नितीन गडकरींच्या मुलीच्या लग्नात 4 कोटी खर्च आला, कुठून आला पैसा?
- शेतकऱ्यांच्या खिशात पैसाच येणार नाही असं यांचं धोरण आहे.
- मी जनतेला नेता मानलं