अमरावती : शेतकऱ्यांना 'साले' संबोधणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासमोर आमदार बच्चू कडू शड्डू ठोकण्याच्या तयारीत आहेत. दानवेंविरोधात लोकसभा निवडणूक लढवण्याचा विचार कडू यांनी बोलून दाखवला.


शेतकऱ्यांच्या स्वाभिमानासाठी रावसाहेब दानवेंविरोधात निवडणूक लढवण्याचा विचार असल्याचं आमदार बच्चू कडू यांनी सांगितलं.

रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना 'साले' संबोधलं होतं. या विधानामुळे शेतकऱ्यांचा अपमान झाला आहे, त्यांच्या जाहीर अपमानाचा बदला म्हणून आपण ही निवडणूक लढवावी, असं जालन्यातील अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांचं मत आहे, असं बच्चू कडू यांनी सांगितलं. याबाबत विचार करुन निर्णय घेऊ, असं बच्चू कडू अमरावतीमध्ये म्हणाले.

बच्चू कडू हे अमरावतीतील अचलपूरचे आमदार आहेत. कडू हे अनोख्या आंदोलनांसाठी राज्यात प्रसिद्ध आहेत. ते प्रहार युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. आतापर्यंत कडूंनी अनेक स्थानिक प्रश्न सरकारसमोर आक्रमकपणे मांडले आहेत.

रावसाहेब दानवे हे 16 व्या लोकसभेत जालन्यातून भाजपचे खासदार आहेत. 1999 पासून ते सलग चौथ्यांदा खासदारपदी आहेत.
मोदी सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय अन्न आणि पुरवठा राज्यमंत्रिपदही भूषवलं आहे.