Bacchu Kadu on Manoj Jarange Patil : महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) सध्या आम्ही नसून जोपर्यंत विधानसभेची (Loksabha Elections 2024) व्यवस्थित बोलणी होत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारचा समोर विचार करणार नाही. ज्याप्रमाणे लोकसभा भाजपला( BJP) महत्त्वाची आहे, तशीच आम्हाला विधानसभा महत्त्वाची आहे. त्यामुळे महायुती मधील इतर लहान घटक पक्षांसोबत चर्चा करून आम्हाला कशा पद्धतीने समोर घेऊन जाणार आहात, जागा वाटपाबद्दल काय निर्णय होणार हे स्पष्ट करावं, अन्यथा आम्ही स्वतंत्र्य लढणार असल्याचा थेट इशाराच प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी दिला आहे.
अन्यथा आम्ही स्वतंत्र लढू
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरु आहे. ही चर्चा अंतिम टप्प्यात आली असली तरी महायुतीमधील घटकपक्षांमध्ये अद्याप मनोमिलन झाल्याचे दिसत नाही. कारण महायुतीमधील घटकपक्षांमधील नेते एकमेकांविरुद्ध जाहीरपणे भूमिका घेताना दिसत आहेत. यामध्ये आता प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा महायुतीवर टीका करत थेट इशाराच दिला आहे. मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असेल यांनी आमच्या लहान पक्षांसोबत चर्चा करावी. जेणेकरून आम्हाला कशा पद्धतीने समोर घेऊन जाणार आहात, जागा वाटपाबद्दल काय निर्णय होतो हे सांगावे अन्यथा आम्ही आमचा स्वतंत्र्य निर्णय घेऊ. आम्हाला कुणाचेही बंधन नसून आमचा कोणी मालक नसल्याचे बच्चू कडू म्हणाले.
त्यांचे अंतर्मन भाजपचं आहे
अमरावती लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी कोणाला मिळणार? नवनीत राणा भाजपमध्ये प्रवेश करुन कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबाबत खासदार नवनीत राणा यांनी सूचक वक्तव्य करत आपल्या भाजप प्रवेशाबाबत संकेत दिले आहे. यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले की, खासदार नवनीत राणा भाजपमध्ये न गेल्यासारखे काय आहे. झेंडा टाकला म्हणजे भाजपमध्ये गेले असं होत नाही. त्यांचे अंतर्मनच भाजपमध्ये आहे. पहिल्यांदा त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निवडून आल्या. त्यावेळी त्या हातात निळा, हिरवा, भगवा असे झेंडे घेऊन लढल्या. आता त्या हिंदू शेरनी झाल्या आहेत, असा टोला देखील बच्चू कडू यांनी खासदार नवनीत राणा यांना लगावला आहे.
भाजपला लहान पक्ष संपवायचे आहेत. त्यामुळे खासदार नवनीत आणि आमदार रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष ते संपवणार आहे. त्याची काळजी त्या पक्षातील लोकांनी घेतली पाहिजे. असा सल्ला देखील बच्चू कडू यांनी दिला. तर दुसरीकडे आमचा पक्ष संपवण्याची ताकद कुणातही नाही, त्यांच्याजवळ संख्या आहे, तर आमच्याकडे कॉलिटी आहे. त्यामुळे सर्व लढाई ही संख्येच्या बळावर जिंकली जात नाही तर गुणवत्तेच्या बळावर जिंकली जात असल्याचे देखील बच्चू कडू म्हणाले.
गॅरंटीचीच गॅरंटी राहिली नाही
देशातील शेतकऱ्यांना 50 टक्के नफा धरून हमीभाव देण्याची पंतप्रधान मोदींनी गॅरंटी दिली होती. ती गॅरंटीच आज संपली आहे. आता गॅरंटीचीच गॅरंटी राहिली नाही. मात्र शेतकरी आमच्यासाठी उच्च स्थानी आहे. जरी आज आम्ही युतीमध्ये सहभागी असलो तरी, शेतकरी मायबाप आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. पाच ते सात लाख कोटींच्या बजेटमध्ये आमच्या दिव्यांगाना काय मिळालं, शेतकऱ्यांच्या हाती काय आलं, असा प्रश्न देखील बच्चू कडू यांनी उपस्थित केला.
दिवसभर उन्हातानात एसटी चालवणाऱ्या ड्रायव्हरचा पगार आणि कलेक्टरच्या गाडी फिरवणाऱ्या ड्रायव्हरला मिळणारा पगार ही विषमता देशात का आहे. एसी गाडीमध्ये एकटा कलेक्टरला घेऊन फिरणाऱ्या चालकाला चाळीस हजार रुपये पगार आणि शंभर लोकांना घेऊन जाणाऱ्या वीस पंचवीस हजार रुपये पगार. हे अतिशय चुकीचा आहे. ही विषमतेची दरी भरून काढण्यासाठी आमच्यासारख्या विचारांचे लोक सत्तेते येणे गरजेचे आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हे चित्र आम्ही बदलून राहू, असा विश्वास देखील बच्चू कडू यांनी बोलताना व्यक्त केला.
इतर महत्वाच्या बातम्या