औरंगाबाद: मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने तांत्रिक मुद्द्यावरुन आमदारकी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आम्ही या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देऊ, अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी एबीपी माझाकडे दिली.

शिवसेनेचे नेते आणि पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने आज हा निर्णय दिला.

राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द

या निर्णयाबाबत त्यांनी एबीपी माझाकडे प्रतिक्रिया दिली.

अर्जुन खोतकर म्हणाले, “तांत्रिक मुद्द्यावर न्यायालयाने आमदारकी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र याबाबत आम्ही सुप्रीम कोर्टात दाद मागू.

27 तारखेला 3 वाजेपर्यंत फॉर्म भरायचे होते. मात्र शेवटच्या दिवशी जो-जो रांगेत असेल, त्या त्या सर्वांचे अर्ज भरुन घेणं आवश्यक असतं. त्यामुळेच तांत्रिक मुद्दा पाहून खंडपीठाने दिलेल्या निर्णयाला मी सुप्रीम कोर्टात आव्हान देणार आहे, तिथे मला दाद मिळेल”, असा विश्वास खोतकर यांनी व्यक्त केला.

औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय

विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीवेळी अर्जुन खोतकर यांचा उमेदवारी अर्ज विहित वेळेनंतर भरण्यात आला, असा आक्षेप काँग्रेसचे नेते आणि तत्कालीन उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी घेतला होता. त्याबाबत त्यांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती.

या याचिकेवरील सुनावणीनंतर न्यायालयाने खोतकर यांची आमदारकी रद्द केली.

दरम्यान या निर्णयावर दाद मागण्यासाठी अर्जुन खोतकर यांना कोर्टानं 4 आठवड्यांची मुदत दिली आहे. तोपर्यंत आमदारकी रद्द करण्याचा निर्णय स्थगित असेल.

कोण आहेत अर्जुन खोतकर?

  • अर्जुन खोतकर हे शिवसेनेचे नेते असून, मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातून आमदार आहेत. जालना मतदारसंघाचं ते प्रतिनिधित्व करतात.

  • 1990, 1995, 2004 आणि 2014 असे एकूण चार वेळा ते आमदार म्हणून निवडून आले. 1999 साली ते महाराष्ट्र सरकारमध्ये राज्यमंत्री होते.

  • सध्या खोतकर हे महाराष्ट्र सरकारमध्ये वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास या मंत्रालयांचे राज्यमंत्री आहेत.

  • आपल्या आक्रमक आणि मुद्देसूद भाषणासाठी अर्जुन खोतकर ओळखले जातात. शिवसेनेची आक्रमकता त्यांच्या वक्तृत्त्वशैलीतून ठळकपणे दिसून येते.


संबंधित बातम्या

राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द