Bhandara News भंडाराभंडारा उपविभागांतर्गत भंडारा आणि पवनी तालुक्यात रिक्त असलेल्या 48 पोलीस पाटील (Police Patil) पदांची भरती प्रक्रिया 2023 मध्ये राबविण्यात आली होती. मात्र, यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत शारदा बुधे यांच्यासह दहा उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या (High Court) नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. न्यायालयानं सोमवारी याचिकेतील प्राथमिक मुद्दे लक्षात घेता राज्य सरकारला एक आठवड्यात भरतीचा मूळ रेकॉर्ड आणि चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पोलीस पाटील भरतीत गैरव्यवहार (Police Patil Recruitment) संबंधित निर्णय प्रक्रियेत नेमका काय निकाल येतो आणि दोषींवर नेमकी काय कारवाई केली जाते याकडे सऱ्यांचे लक्ष लागले आहे.


हायकोर्टानं मागितला भरती प्रक्रियेच्या मूळ रेकॉर्डसह चौकशीचा अहवाल


भंडाऱ्यातील पोलीस पाटील भरती प्रक्रियेत उमेदवारांची 80 गुणांची लेखी आणि 20 गुणांची मौखिक परीक्षा घेण्यात आली. मौखिक परीक्षेसाठी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. परंतु, समिती सदस्यांनी स्वतः मौखिक परीक्षा घेतली नाही आणि त्यासाठी वेगळे प्रतिनिधी पाठविले. त्यांनी लेखी परीक्षेत जास्त गुण घेणाऱ्यांना मौखिक परीक्षेत कमी तर, लेखी परीक्षेत कमी गुण घेणाऱ्यांना मौखिक परीक्षेत जास्त गुण दिले. दरम्यान, निवड झालेल्या उमेदवारांना मौखिक परीक्षेत अवैधपणे 18 ते 19 गुण देण्यात आले, असा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे.


याचिकाकर्त्यांतर्फे ऍड.सुमंत देवपुजारी यांनी कामकाज पाहिले. याचिकेवर न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे आणि अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली. पोलीस पाटील भरती प्रक्रियेमध्ये भंडाऱ्याचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड, भंडाऱ्याचे तहसीलदार अरविंद हिंगे आणि पवनीच्या तहसीलदार नीलम रंगारी यांना यापूर्वीच निलंबित करण्यात आलं आहे. दरम्यान या गैरव्यवहार प्रकरणी आता हायकोर्टानं हस्तक्षेप करत भरतीचा मूळ रेकॉर्ड आणि चौकशी अहवाल मागितला आहे. त्यामुळे या प्रकरणी आता नेमका काय निर्णय येतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


पावसाचा पोलीस भरती प्रक्रियेवरही परिणाम, विद्यार्थ्यांची तारांबळ


अमरावती ग्रामीण पोलि‍सांची भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी अमरावतीच्या जोग मैदानावर सुरू आहे. मैदानी चाचणी देण्यासाठी महिला उमेदवार सकाळी 4 वाजता पासून दाखल झाल्या आहेत. मात्र, गेल्या दोन दिवसापासून अमरावतीत मुसळधार पाऊस सुरू असल्याने मैदान अक्षरक्ष: चिखलमय झाले आहे. मैदानावर चिखल असल्याने मुलींना धावण्यात अडथळा निर्माण होतो. मात्र मैदानात चिखल असल्याने मैदानी चाचणी देतांना मोठ्या दुर्घटनेलाही समोर जावे लागू शकते. त्यामुळे मैदानी चाचणी पुढे ढकलावी, अशी मागणी काही मुलींनी केली आहे. तर काही मुली आतमध्ये मैदानी चाचणी साठी गेल्या आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या