नगरच्या कर्जतमध्ये अल्पवयीन मुलीची छेडछाड, गावकऱ्यांचा संताप
एबीपी माझा वेब टीम | 29 Jul 2016 01:08 PM (IST)
अहमदनगरः कर्जत तालुक्यातील बांभोरा गावात अल्पवयीन मुलीची शाळेत जाताना तीन तरुणांनी छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संतप्त गावकऱ्यांनी आरोपी आणि पोलिसांनाही ग्रामपंचायत कार्यालयात डाबूंन ठेवलं आहे. शाळेत जाताना तीन तरुणांकडून पीडित मुलीची छेड काढण्यात आली. तिच्याशी अश्लील भाषेत वर्तन करण्यात आलं. मुलीने हा सर्व प्रकार घरी सांगितल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं. मात्र संतप्त गावकऱ्यांनी पोलिसांसह आरोपींनाही कोंडून ठेवलं. तसंच पोलिसांच्या गाडीवर दगडफेकही केली. तर तुझंही कोपर्डीसारखं करु- मुलीला धमकी पीडित मुलगी काल शाळेत जात असताना तीन तरुणांनी तिला चिठ्ठी देत छेडछाड केली. मुलीची छेड काढल्यानंतर तिला धमकीही देण्यात आली. हा प्रकार घरी सांगितलास तर तुझंही कोपर्डीतील मुली सारखं करु, अशी धमकी आरोपींनी मुलीला दिली. दरम्यान या घटनेमुळे मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कर्जतमधील कोपर्डी बलात्कार प्रकरणामुळे सगळीकडेच खळबळ उडाली असताना कर्जत तालुक्यातच हा धक्कादायक प्रकार घडला आहे.