मुंबई : दिवसभरात तीन बैठका आणि तब्बल चार तासांच्या खलबतानंतर महाविकास आघाडी सरकारचं खातेवाटप उद्या होणार असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर काँग्रेस नेते प्रमुख खात्यांसाठी आग्रही आहेत. त्यावरुन मागणी योग्य असली तरी तुटेपर्यंत ताणू नये, असा सूचनावजा सल्लाच अजित पवारांनी काँग्रेसला दिला आहे. खातेवाटपाची यादी तयार आहे, उद्या संध्याकाळपर्यंत खातेवाटप होईल असा दावा अजित पवार यांनी केला आहे.

मंत्रालयातील खातेवाटपावर चार तास झालेल्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली. अजित पवार म्हणाले, महाराष्ट्र विकास आघाडीत कोणतीही कुरबुरी नाही. मागणी करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. कुणाला कुठलं खातं द्यायचं हे निश्चित झालं आहे. तसंच अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा असणार आहे.

Ajit Pawar | खातेवाटप उद्या जाहीर होण्याची शक्यता : अजित पवार | ABP Majha



राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं द्यायचं याची यादी शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या नेत्याला कोणतं खात द्याच याचा अंतीम निर्णय शरद पवार यांचा आहे. खातेवाटपावर तिन्ही पक्ष समाधानी आहेत का? यावर अजित पवार म्हणाले, ' हे बघा माझं असं मत आहे की तुटेपर्यंत कधीच काही ताणायचं नसतं. मागणी करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र एकदा पक्षाने निर्णय घेतला की तो मान्य झाला पाहिजे. प्रत्येक पक्षाने आपल्या परिने मागणी करण्याचं काम केलं आहे. आता अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील.'

आमच्यात कोणत्याही कुरबुरी, हेवेदावे नाहीत असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं. पालकमंत्रीपद कुणाला कोणतं द्यायचं यावरही चर्चा झाली. सध्या 43 मंत्री आहेत, त्यांच्याबाबतही चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर आम्ही निघालो आहोत. उद्यापर्यंत सगळं खातेवाटप अगदी पालकमंत्री पदांसहीत जाहीर होण्याची शक्यता आहे असा दावा अजित पवार यांनी केला आहे. तसंच कोणत्याही कुरबुरी, तक्रार, वाद आमच्यात नाही. कोणत्याही तथ्यहीन आणि आधार नसलेल्या चर्चांवर, अफवांवर विश्वास ठेवू नका असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.