Nagpur News : हिवाळी अधिवेशनाची (Winter Assembly Session) तयारी पूर्ण झाली असून, कालपासून सरकारचे नागपुरात आगमन होण्यास सुरूवात झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) शनिवारी रात्री नागपुरात (Nagpur) पोहोचले. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) रविवारी सकाळच्या वेळी नागपुरात दाखल होतील. विदर्भातील बहुतांश मंत्री शनिवारीच नागपुरात पोहोचले आहेत. इतर मंत्री रविवारी सकाळी नागपुरात डेरेदाखल होतील. दरम्यान, विधानपरिषदेच्या उपनसभापती निलम गोऱ्हे यांचे शनिवारी सकाळी नागपुरात आगमन झाले आहे. 


विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) रविवारला दुपारी 3 वाजता येतील. त्यानंतर दुपारी 4 वाजता उपसभापती, अध्यक्ष हिवाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतील. सोमवार, 19 डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशनास सुरूवात होत आहे. त्यासाठी विधानभवन सचिवालयाचे कामकाजही सुरू झाले आहे. आता नागपूरकरांना मायबाप सरकारची प्रतीक्षा आहे. तीन वर्षानंतर नागपुरात हिवाळी अधिवेशन होत आहे. त्यामुळे नव्या सरकारकडून नागपूरकर आणि वैदर्भीयांना बऱ्याच अपेक्षा आहेत. या अपेक्षा अधिवेशनकाळात पूर्ण होतील का, याकडे सर्वांच्या नजरा असतील.


नागपुरातील अधिवेशन कायम सरकारसाठी परीक्षा असते. राज्यात शिंदे-भाजप सरकार आले आहे. तसेच या सरकारचे हे पूर्णवेळ होणारे पहिलेच अधिवेशन असल्याने त्यांच्यासाठी आव्हानच असेल. फडणवीसांच्या रूपात या सरकारमध्ये नागपूरकर असलेला व्यक्ती उपमुख्यमंत्री आहे. त्यांना मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते असा अनुभव असल्याने ते विरोधकांचे आव्हान परतवून लावतील. मात्र, गेल्या काही दिवसात राज्यातील महापुरूषांचा अवमान, कर्नाटक सीमावाद, राज्यपालांच्या वक्तव्याने राजकीय वादळं उडत आहे. त्यातच राज्यात सातत्याने निघणारे मोर्चे बघता अधिवेशनात या सर्व बाबींच्या प्रतिबिंब उमटतील. त्यामुळेच हे अधिवेशन वादळी होईल, असे बोलले जात आहे.


नक्की किती कामकाज? 


कामकाज सल्लागार समितीने 30 डिसेंबरपर्यंतचे कामकाज ठरवले आहे. मात्र, पहिल्या आठवड्यातच अनेक महत्वाच्या विषयावर चर्चा घडवून आणण्याचा सरकारचा मानस आहे. तर, विरोधक गेल्या काही दिवसातील मुद्यांवर सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील. दुसऱ्या आठवड्यात केवळ शासकीय कामकाज असल्याने, विरोधक काय भूमिका घेतात, याकडे सर्वांच्या नजरा असतील. सध्या राज्यपालांसह नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांवरुन राज्यभरात विरोधाची लाट आली आहे. हा मुद्दा आणि कर्नाटक सीमावादाचा मुद्दा या अधिवेशनात प्रामुख्यानं गाजणार आहे. 


ही बातमी देखील वाचा


Vidarbha Weather : नागपूरसह विदर्भात आजही राहणार ढगाळ वातावरण