वाशिम : वाशिम जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आताच मंत्री झाले आहे. अजून खिसे गरम झाले नाहीत, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत. तसंच विरोधक पैसा वाटत असतील, तर नाही म्हणू नका, लक्ष्मीला कुणी नाही म्हणतं का? पण मतदान मात्र पंजालाच करा, असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं आहे.


त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी टीका केली आहे. "या आमच्या नव्या मंत्री आहेत. आताच शपथ घेतली आहे, अजून खिसे गरम झालेले नाही. अशी वक्तव्ये करुन हे लोक स्वत:सोबतच पक्षालाही बदनाम करत आहेत. याच दिवसासाठी या सगळ्यांनी सरकार स्थापन करण्यासाठी पक्षावर दबाव टाकला होता?" अशा शब्दात निरुपम यांनी ठाकूर यांच्यावर टीका केली आहे.

यशोमती ठाकूर म्हणाल्या की, "आमची सत्ता नव्हती. आताच शपथ घेतली आहे. अजून खिसे गरम झालेले नाही. जे विरोधक आहेत, त्यांचे खिसे भरलेले आहेत. तो रिकामा करण्यासाठी ते मत मागायला येत आहेत. लक्ष्मीला नाही म्हणून नका, पण मत पंजालाच द्या."


यशोमती ठाकूर यांच्या या वक्तव्यावर भाजपने आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. पक्षाचे माजी खासदार आणि नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटरद्वारे याची माहिती दिली.


याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही लक्ष्मीदर्शनाचा उल्लेख करुन वाद ओढावून घेतला होता. पण आता खातं मिळालेल्या पहिल्याच दिवशी पैसे घ्या, असं वक्तव्य केल्याने नवनिर्वाचित मंत्री अडचणीत सापडल्या आहेत.

वाशिम जिल्हा परिषद निवडणूक प्रचाराचा काल (5 जानेवारी) शेवटचा दिवस होता. 52 जागांसाठी सगळेच पक्ष स्वबळावर लढत आहेत. सगळ्याच पक्षांच्या उमेदवारांचा चांगलाच कस लागला आहे. शेवटच्या दिवशी रिंगणातील उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांकडे मतं मागितली. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, भाजपा, बहुजन वंचित आघाडी आणि जिल्हा विकास आघाडी इत्यादी पक्ष मैदानात उतरले आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच पक्षांना मोठी कसरत करावी लागत आहे.