जळगाव : जिल्हा परिषद विषय समिती सभापती पदाची निवड होत आहे. यात कोणाची वर्णी लागते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. जळगाव जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक संपल्यावर आता आज होणाऱ्या सभापती निवडीकडे सगळ्यांचे लक्ष लागले असल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषदेत भाजपने पुन्हा सत्ता काबीज केल्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची अनेक सदस्यांची संधी गेल्याने त्यातील कोणाला सभापती पदासाठी वर्णी लागते की डावलले जाते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तर, दुसरीकडे खडसे आणि महाजन यांचं खरंच मनोमिलन झालं की अपरिहार्यता आहे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

सभापती पदाच्या चार जागांसाठी नाव निश्चितीसाठी काल भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात बंद दाराआड बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये दोघांच्या समन्वयातून नाव निश्चित करणयात आले आहे. मात्र, अंतिम निर्णय प्रदेशाध्यक्ष घेणार असल्याचे सांगण्यात आले. नाव निश्चित झालेल्या सभापतीची नावं गोपनीय ठेवण्यात आली आहेत. जिल्हा परिषद सभापती पदाची निवड प्रक्रियापेक्षा जास्त चर्चा आहे ती गिरीश महाजन आणि खडसे यांच्या पुन्हा एकदा एकत्रित आल्याची. आज(सोमवार)दुपारी अकरा वाजल्यापासून सभापती निवड प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. दोन वाजेपर्यंत निवड झालेल्या सभापतींच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

खडसे-महाजन-फडणवीस मनोमिलन?
जळगाव जिल्हा परिषद निवडणुकीअगोदर भाजप नेते एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले होते. फडणवीस आणि महाजन यांच्यामुळेच माझं तिकीट कापलं, असं ते म्हणाले होते. मात्र, जिल्हा परिषदेच्या पार्श्वभूमीवर या नेत्यांची बैठक पार पडली. यात या तिघाचं मनोमिलन झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान जिल्हा परिषदेतील विजयानंतर खडसे यांनी भाजपची सत्ता यापुढेही कायम राहील. जळगावचा गड राखल्यानंतर एकनाथ खडसे आणि गिरीष महाजनांनी एकत्र येत पत्रकारांना प्रतिक्रिया दिली. गिरीष महाजनांनी हे संघटनात्मक यश असल्याचं सांगितलं. जळगाव हा भाजपचा बालेकिल्ला आहे. आमच्यात कुठेही कटूता नाही, हे तुम्हाला दिसलं असेल, असंही महाजन म्हणाले. त्यामुळे खडसे-महाजन यांचं मनोमिलन झालं आहे की निवडणुकीची अपरिहार्यतेमुळे ते एकत्र आलेत, असा सवाल लोक विचारतायेत.
जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा -
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपच्या रंजना पाटील तर उपाध्यक्षपदी लालचंद पाटील विजयी झाले. या निवडणुकीचा विचार केला तर एकनाथ खडसे, गिरीश महाजन आणि महाविकास आघाडीचे गुलाबराव पाटील यांच्या दृष्टीने ही निवडणूक राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाची होती. तितकीच प्रतिष्ठेचीही होती. खुल्या वर्गासाठी महिला राखीव असलेल्या अध्यक्षपदाच्या निवडीत भाजपच्या रंजना पाटील यांनी महाविकास आघाडीच्या रेखा राजपूत यांचा 34 विरुद्ध 31 अशा मतांनी पराभव केला. भाजपकडे स्वबळाचे 33 उमेदवार होते. यामध्ये नंदा सपकाळे या आजारी असल्यानं गैरहजर राहिल्या. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे तीन सदस्य आपल्याकडे खेचण्यात भाजपला यश मिळाले आहे. यामध्ये काँग्रेस पक्षाचे दिलीप पाटील, तर राष्ट्रवादीच्या मीना पाटील यांच्यासह आणखी एक सदस्य गळाला लावण्यात भाजपला यश मिळाले आहे. या लढतीमध्ये एकूण 66 सदस्यांचं मतदान होतं. पक्षीय बलाबलाचा विचार केला तर भाजप 33, काँग्रेस 4, राष्ट्रवादी 16, शिवसेना 15 अशा प्रकारचं बलाबल होतं.

संबंधित बातमी - आरोप-प्रत्यारोपानंतर खडसे, फडणवीस आणि महाजन जळगावमध्ये एकत्र, झेडपीवरही भाजपचा झेंडा

Mahajan and Khadse | आरोप-प्रत्यारोपानंतर एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र | ABP MAJHA