सांगली : केंद्रातील भाजपा सरकार मोठ्या उद्योगपतीच्यासाठी काम करत असून भाजपाला शेतकऱ्यांची अॅलर्जी आहे, अशी टीका कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केली आहे. किसान अधिकार दिवस पाळून सत्याग्रह आंदोलन, भाजपा सरकार विरोधात सांगलीतील काँग्रेस भवनमध्ये करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते.


दिल्लीतील केंद्र सरकार हे काही मोजक्या मोठ्या उद्योगपतींच्या साठी काम करत आहे. या सरकारला ग्रामीण भाग आणि शेतकऱ्यांची अॅलर्जी आहे,अशी टीका मंत्री विश्वजित कदम यांनी केली आहे. तसेच राज्यातील अतिवृष्टी नुकसान भरपाईबाबत बोलताना राज्य सरकारने महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना मदत करण्याचे काम केलेलं आहे. दहा हजार कोटींची मदत राज्य शासनाने जाहीर केलेली आहे, आणि आता केंद्रानेही आपले कर्तव्य पार पाडावे, अशी मागणी विश्वजीत कदम यांनी यावेळी केली आहे.


केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाविरोधात काँग्रेसकडून देशभर किसान अधिकार दिवस पाळून भाजपा सरकारच्या निषेधार्थ सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. सांगली जिल्हा काँग्रेसच्यावतीनेही सांगली शहरातल्या काँग्रेस भवन या ठिकाणी हे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. राज्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली यावेळी भाजप सरकारच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं. केंद्र सरकारच्या कृषी धोरणांच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करत शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनामध्ये काँग्रेस नेते विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी बोलताना कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी भाजपा सरकार व जोरदार निशाणा साधला आहे.


आता विरोधकांनी केंद्राकडून मदत आणावी


भाजपाच्या नेत्यांकडून होणाऱ्या टिकेबाबत बोलताना, विरोधकांनी काय केलं? असा सवाल उपस्थित करत केंद्रामध्ये त्यांची सत्ता आहे. त्यांचे सरकार आहे आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना अधिकची मदत मिळण्यासाठी केंद्राकडे मागणी करायला हवी. महाराष्ट्र हा सर्व पक्षांचा आहे, सर्वसामान्यांचा आहे. त्यामुळे आपला महाराष्ट्र म्हणून विरोधी भाजपाने आपल्या सरकारकडून महाराष्ट्राला मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असा टोला विश्वजीत कदम यांनी लगावला आहे.